Breaking

शिक्षक, प्राचार्य ते कार्यकर्ते म्हणून डॉ.किशन पवार यांचा नांवलौकिक – प्रा.सतिशराव पत्की

Updated: June 5, 2025

By Vivek Sindhu

प्राचार्य डॉ.किशन पवार सेवापूर्ती गौरव, ग्रंथ प्रकाशन आणि सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

वैयक्तिक व सामाजिक जीवनात डॉ.किशन पवार यांनी माणसं जोडली – नंदकिशोर मुंदडा

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- लोकमान्य टिळक महाविद्यालय, वडवणी (जि.बीड) चे प्राचार्य डॉ.किशन मनोहर पवार हे नियत वयोमानानुसार शनिवार, दिनांक ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त अंबाजोगाईत भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा तसेच प्राचार्य किशन पवार लिखित ‘बंजारा संस्कृति का समग्र इतिहास’ या ग्रंथाचे प्रकाशन आणि पवार यांचे वडील मनोहर रामा पवार यांचा सहर्षचंद्र दर्शन व तुलाई कार्यक्रम रविवार रोजी आयोजित करण्यात आला होता.

आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात रविवार, दिनांक १ जून रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापा) मोदी तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्यवाह प्रा.सतिशराव पत्की, प्राचार्य डॉ.प्रकाश जाधव, दिगंबर राठोड आणि गौरवमूर्ती प्राचार्य डॉ.किशन पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी ऍड.लक्ष्मण कदम, प्राचार्य डॉ.हरिदास फेरे, डॉ.ऋषिकेश पवार, डॉ.सुभाष पवार, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, दिगंबर राठोड, अमरनाथ खुर्पे, गौरव समिती अध्यक्ष डॉ.प्रकाश जाधव, सचिव उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, हर्षवर्धन पवार आदींनी आपल्या मनोगतातून विविध संदर्भ, दाखले देत व स्वअनुभव कथन करून प्राचार्य डॉ.किशन पवार यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

याप्रसंगी बोलताना प्रा.सतिशराव पत्की यांनी सांगितले की, प्राचार्य डॉ.किशन पवार यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात प्राचार्य रा.गो.धाट, डॉ.शरदराव हेबाळकर आणि माझा मोलाचा वाटा आहे. पवार हे अभाविप, संघ परिवाराच्या विचाराचे पाईक आहेत. लोकमान्य टिळक महाविद्यालय, वडवणी (जि.बीड) चे नॅक मुल्यांकन करून घेण्यासाठी पवार यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. अनेक आव्हाने स्वीकारून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

आपल्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे आयोजन करून त्यांनी वडिलांचा सन्मान केला. शिक्षक, प्राचार्य ते कार्यकर्ते म्हणून डॉ.किशन पवार यांचा सर्वदूर नांवलौकिक असल्याचे गौरवोद्गार प्रा.पत्की यांनी काढले. ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी डॉ.पवार यांच्याशी आपला मागील ३५ वर्षांपासूनचा स्नेहबंध आहे.

पवार हे खोलेश्वर संस्कारात वाढले आहेत. वैयक्तिक व सामाजिक जीवनात डॉ.पवार यांनी माणसं जोडली, घडवली, जमवली आणि टिकवून ठेवली हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे असे श्री.मुंदडा म्हणाले. प्राचार्य डॉ.किशन‌ पवार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मी ग्रामीण भागातील डोंगर दऱ्यातून इथपर्यंत आलो.

माझ्या जडणघडणीत माझे चुलते सिताराम पवार, प्राचार्य रा.गो.धाट, डॉ.शरदराव हेबाळकर आणि प्रा.सतिशराव पत्की यांचा मोलाचा वाटा आहे. मी अत्यंत कष्टाने, मेहनतीने प्रसंगी मजुरी करून शिक्षण घेत राहिलो. माझा मुळ पिंड हा संघ परिवारात घडलेला आहे. मी आजपावेतो १२ ग्रंथ लिहिले, कारगिल शहिदांना आर्थिक मदत दिली. ३५ वेळा रक्तदान केले. यापुढील आयुष्यात समाजसेवा करणार आहे असे सांगून सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोप करताना राजकिशोर मोदी म्हणाले की, प्राचार्य डॉ.किशन‌ पवार हे माझे जिवलग मित्र आहेत. ते सामान्य कुटुंबातून पुढे आले. शिक्षण व अनुभवाच्या बळावर प्राचार्य झाले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना घडविण्यात चुलते सिताराम पवार, प्राचार्य रा.गो.धाट, डॉ.शरदराव हेबाळकर आणि प्रा.सतिशराव पत्की यांचा मोलाचा वाटा आहे. प्राचार्य डॉ.पवार हे एक संघर्षयोध्दा आहेत असे मोदी यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ‌.प्रकाश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सोळुंके यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.उध्दव चव्हाण यांनी मानले.

यावेळी सभागृहात ऍड.शिवाजीराव कराड, बळीराम पवार (आएएस, माजी जिल्हाधिकारी), ऍड.किशोर गिरवलकर, अशोक राठोड, प्राचार्य रा.गो.धाट, प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे, प्राचार्य डॉ.ताराचंद होळंबे, प्राचार्य डॉ.अरूण दळवी, प्रा.शरदराव हेबाळकर, बंडू सूर्यवंशी, डॉ.नरेंद्र काळे, विजयकुमार कोपले, मुकूंद पाटील, प्रा.मजगिरे, मधुकर राठोड, संजय राठोड, डॉ.प्रमोद वडते, डॉ.प्रिया पवार, डॉ.प्रिती पवार, राजेश चव्हाण, धनराज राठोड, डॉ.शंकर पवार, डॉ.सुभाष राठोड, डॉ.विवेकानंद चव्हाण, श्रीनिवास जोशी, शंतनु जोशी, डॉ.दीपक देशमुख, विजय राठोड (नागपूर) आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवर व्यक्तींना भेट म्हणून भारतीय संविधानाच्या १०० प्रती देण्यात आल्या. प्राचार्य डॉ.किशन पवार सेवापूर्ती गौरव, ग्रंथ प्रकाशन आणि सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा यशस्वितेसाठी डॉ.प्रकाश जाधव (प्राचार्य तथा अध्यक्ष, गौ.सो.समिती.), प्रा.गौतम गायकवाड (उपप्राचार्य तथा सचिव, गौ.सो.समिती.), डॉ.सौ.प्रिया प्रमोद वडते (एम.डी.पुणे), डॉ.सौ.प्रीती राजेश चव्हाण (एम.डी.पुणे), ऋषिकेश किशन पवार, हर्षवर्धन किशन पवार, पत्रकार जगन सरवदे, गणपत जाधव, संजय जाधव आदींसह गौरव सोहळा समिती आणि पवार कुटुंबियांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.