बीड : गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका संशयिताला अटक करत पिंपळनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ही घटना आज दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव किशोर रामभाऊ माटे (वय ३७, रा. लोणी, ता. बीड) असे आहे.
पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांना खाजगी बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, पिंपळनेर ते लोणी फाटा रस्त्यावर ओमकार हॉटेलसमोर एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक गोलवाल, ग्रेपो उपनिरीक्षक शेळके, पोलीस नाईक बांगर, पोलीस शिपाई पठाण, पोलीस शिपाई पिंपळे व सानप यांच्यासह दोन पंचांना घेऊन घटनास्थळी धाव घेण्यात आली.
तपासणीदरम्यान संशयिताची झडती घेतली असता, त्याच्या कमरेच्या मागील बाजूस अर्धवट गंजलेले गावठी पिस्तूल आढळले. पिस्तुलासंदर्भात परवान्याची चौकशी केली असता, कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले आहे.
प्राथमिक तपासात आरोपीने बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.