परळी : परळी शहरातील हलगे गार्डन येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी शिव महाकथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने महिलांची गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेत काही महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन व मंगळसूत्र चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या.
याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 176/2024 नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक आर. के. नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गोविंद भताने, घटमळ व पो. ना. पांचाळ यांनी केला. तपासादरम्यान आरोपी महिला बीड व धाराशिव येथे शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली चैन व मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले.
आज रोजी फिर्यादी कमलाबाई मोतीलाल बांगड यांचा मुलगा मनोजकुमार मोतीलाल बांगड यांना एक सोन्याची चैन (कीमत अंदाजे ₹2,50,000) परत करण्यात आली. सदर चैन सुमारे 25 ग्रॅम वजनाची आहे.
सोन्याचे दागिने परत मिळाल्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी परळी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई परळी पोलिसांनी तात्काळ व प्रभावीपणे पार पाडल्याने नागरिकांतून पोलीस दलाचे कौतुक होत आहे.