Breaking
Updated: मार्च 11, 2026
आष्टीत आई वडील रागावले;तरुणाची आत्महत्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – आई-वडिलांनी घरगुती कामात मदत करत नसल्याच्या कारणावरून रागावल्याचा राग मनात धरून 21 वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची मोठी घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे काल मंगळवारी सकाळी घडली. विराज हरिदास भगत असं या मृत तरुणाचं नाव असून, तो आपल्या आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत विराज हा गेल्या काही दिवसांपासून घरच्या कामांकडे दुर्लक्ष करत होता. यावरून त्याचे आई-वडील त्याच्यावर काही प्रमाणात नाराज होते. काल मंगळवारी सकाळी याच कारणावरून आई-वडिलांनी त्याला ’घरच्या कामात मदत का करत नाहीस?’, असं विचारत थोडं रागावलं होतं. मात्र, पालकांचं हे बोलणं विराजच्या मनाला चांगलंच लागलं.
घरच्यांनी आपल्याला सर्वांसमोर रागवल्याचा प्रचंड राग आणि नैराश्य त्याच्या मनात निर्माण झालं. याच मनस्थितीत विराज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. तो थेट गावातील काळशेत शिवारातील आपल्या मालकीच्या सर्व्हे नं. 119 मधील शेतात पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्याने एका आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विराज बराच वेळ घरी न परतल्यानं आणि तो शेताकडे गेल्याचा अंदाज असल्यानं त्याची बहीण त्याला शोधण्यासाठी शेतात गेली होती. मात्र, तिथे गेल्यानंतर तिला समोर जे दृश्य दिसले त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला भाऊ झाडाला लटकलेल्या अवस्थेत तिला दिसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर परिसरात असलेल्या लोकांनी आणि पालकांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली. रुग्णालयात नेले, पण उशीर झाला होता कुटुंबियांनी त्याला तातडीने खाली उतरवून कडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले. एका तरुण मुलाचा असा अचानक अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.