Breaking

पन्नगेश्वर शुगर मिल्सच्या २०२५-२६ च्या गळीत हंगामाला सुरुवात

Updated: नोव्हेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

पन्नगेश्वर शुगर मिल्सच्या २०२५-२६ च्या गळीत हंगामाला सुरुवात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अत्यंत साधेपणात सोहळा; पहिला हप्ता २,७०० रुपयांचा देण्याची अक्षय मुंदडा यांची घोषणा

रेणापूर : पानगाव येथील पन्नगेश्वर शुगर मिल्सच्या २०२५-२६ गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला. राज्यात निवडणुकांची धामधुम असल्याने कोणताही समारंभ न करता कारखाना परिसरातच प्रतिकात्मकरित्या हंगामाची सुरुवात झाली. लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे आणि स्व. विमलताई मुंदडा यांच्या प्रतिमांना अभिवादन करून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

हा कारखाना लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी पानगाव परिसरातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सुरु केला होता. मात्र, गेली तीन वर्षे कारखाना बंद अवस्थेत होता. NCLT च्या प्रक्रियेनंतर अक्षय मुंदडा यांनी यंदाच्या जून महिन्यात कारखान्याचा ताबा घेतला. ताबा मिळाल्यानंतर १५ जूनपासून व्यापक दुरुस्ती, उपकरणे बदल आणि तांत्रिक सुधारणा यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. विशेषतः जुना बॉयलर काढून संपूर्णतः नवीन बॉयलर बसवण्यात आल्याने यंदा गाळप पूर्ण क्षमतेने होणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

या हंगामात तब्बल ३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याचे अध्यक्ष अक्षय मुंदडा यांनी शेतकऱ्यांसाठी पहिला हप्ता प्रतिटन २,७०० रुपये जाहीर केला. हंगामाच्या अखेरीस कारखान्याची आर्थिक स्थिती पाहून अंतिम हप्त्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

गाळपासाठी यंदा रेणापूर, परळी, अंबाजोगाई, चाकूर, केज आणि लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने स्वीकारला जाणार आहे. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानताना मुंदडा यांनी पानगाव परिसरातील ऊस उत्पादकांचे हित जपणे हे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आपले ध्येय असल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान, दुरुस्तीच्या कामामुळे कारखान्याला नवचैतन्य प्राप्त झाले असून, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी सकारात्मक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts