Breaking
Updated: मार्च 2, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाई उपविभागामध्ये सध्या सुरू असलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारावर राबवली जात असल्याची माहिती अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी दिली आहे. लेखी परीक्षेनंतर आता मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू झाले असून या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली आहे. निवडीचा निकष केवळ गुणवत्ता हाच असल्याने कोणत्याही उमेदवाराने किंवा त्यांच्या पालकांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
भरती प्रक्रियेच्या नावाखाली काही समाजकंटक किंवा मध्यस्थ आपली ओळखी आहे किंवा मी काम करून देतो असे सांगून उमेदवारांची दिशाभूल करण्याची शक्यता असते. अशा अफवांवर किंवा व्यक्तींवर विश्वास न ठेवता उमेदवारांनी केवळ आपल्या कष्टावर आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावे. जर कोणाशी अशा प्रकारचा संपर्क साधला गेला किंवा कोणाकडून पैशांची मागणी झाली तर तात्काळ योग्य त्या ठिकाणी तक्रार नोंदवावी असे आवाहन वजाळे यांनी केले आहे. उमेदवारांचे शिक्षण, लेखी परीक्षेतील गुण आणि मुलाखतीचे गुण यांच्या एकत्रित आधारावरच अंतिम निवड केली जाणार आहे.
पोलीस पाटील हे पद गावपातळीवर अत्यंत महत्त्वाचे असल्याने या पदासाठी योग्य आणि गुणवंत उमेदवारांची निवड होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया कोणत्याही दबावाशिवाय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी उत्साहाने आणि आत्मविश्वासाने या प्रक्रियेला सामोरे जावे. प्रशासकीय स्तरावर सर्व खबरदारी घेतली जात असून केवळ पात्र उमेदवारांनाच संधी मिळेल असा विश्वास उपविभागीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.