परळी, दि. १ (प्रतिनिधी): बीडहून नांदेडकडे जाणाऱ्या शिवशाही एसटी बसचा आणि रिक्षाचा परळीजवळ पांगरी कॅम्प परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
मृत रिक्षाचालकाचे नाव श्रीनिवास शिवाजी राठोड (वय २३, रा. पांगरी तांडा) असे आहे. ते रिक्षातून काही महिलांना शेतामध्ये सोडून परळीकडे परतत असताना पांगरी रोडवर शिवशाही बसने (एमएच ०४ एफएल ०९८८) त्यांच्या रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षा काही अंतर फरफटत गेली आणि श्रीनिवास राठोड यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी शिवशाही बसच्या काचा फोडल्या. काही प्रवाशांनीही घटनास्थळी उतरून मदत केली. या अपघातामुळे बीड-परळी महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, उपनिरीक्षक शेख, सहाय्यक फौजदार लक्ष्मण टोले, जमादार दत्ता उबाळे, रमेश तोटेवाड, सुनील अन्नमवार आदी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करून परिस्थिती नियंत्रणात आणली.