Breaking
Updated: मार्च 5, 2026
१० लाखांच्या गांजासह एक जेरबंद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाई उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत १० लाख ८०० रुपये किमतीचा ३३ किलो ३६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी नितीन लिंबाजी कांदे (वय ३०, रा. कांदेवाडी) याला रंगेहात पकडले असून, त्याचे दोन साथीदार भाऊसाहेब चौधरी आणि बबलू उर्फ व्यंकटेश फड हे पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती फाट्याजवळ पट्टीवडगाव रोडवरील एका शेतात ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी नितीन कांदे आणि भाऊसाहेब चौधरी हे दोघे गांजा घेऊन धर्मापुरी येथील भास्कर रोकडोबा फड याच्या शेतातील पत्र्याच्या खोलीत विक्रीसाठी आले होते. हा गांजा भास्कर फड याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने मागवला होता. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांना याबाबत गुप्त माहिती मिळताच त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह धर्मापुरी शिवारात छापा टाकला. या ठिकाणी दोन पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये पान, फुले आणि बियांसहित दाबेलेला उग्र वासाचा गांजा पोलिसांना मिळून आला.
जप्त केलेल्या गांजाच्या एका पोत्याचे वजन २४ किलो ५६० ग्रॅम आणि दुसऱ्या पोत्याचे वजन ८ किलो ८०० ग्रॅम असे एकूण ३३ किलो ३६० ग्रॅम भरले. बाजारभावाप्रमाणे याची किंमत प्रति किलो ३० हजार रुपये असून एकूण मुद्देमाल १० लाख ८०० रुपयांचा आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार महादेव आवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८(क) आणि २० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि कांबळे आणि त्यांच्या पथकाने घटनेचा रीतसर पंचनामा केला असून फरार आरोपी भाऊसाहेब चौधरी आणि बबलू फड यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधातील या मोठ्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.