दोन्ही बाजूच्या आजी-माजी सदस्यांचा समावेश
अंबाजोगाई : मराठवाड्याचे कुलदैवत मानले जाणारे आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवी मंदिराच्या विश्वस्त मंडळावर गेल्या दशकभरापासून सुरू असलेला वाद अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. धर्मदाय उपआयुक्त, बीड यांनी २८ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार मंदिराचे नवे विश्वस्त मंडळ जाहीर करण्यात आले असून, यामध्ये १९ सदस्यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ चालत आलेल्या वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून, पुढील पाच वर्षांसाठी मंदिर प्रशासन नव्या विश्वस्त मंडळाच्या अखत्यारीत राहणार आहे.
न्यायालयीन पार्श्वभूमी
योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची स्थापना १९६५ मध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास अधिनियमांतर्गत करण्यात आली होती. सुरुवातीला १९७३ मध्ये घटना ठरवली गेली, मात्र हरकतींमुळे ती रद्द झाली. पुढे २००६ मध्ये दोन स्वतंत्र घटना अर्ज दाखल झाल्यानंतर २०१६ मध्ये सामंजस्याने एकत्रित घटना मंजूर झाली. मात्र, या घटनेला काही पुजारी कुटुंबातील वंशजांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली. मूळ अनुदानधारक नरसुबाई यांचे वंशज असून, त्यांना पुजारी आणि विश्वस्त म्हणून वंशपरंपरागत अधिकार आहेत. परंतु २०१६ मध्ये मंजूर झालेल्या घटनेत त्यांना न ऐकता निर्णय घेतला गेला, जो कायदेशीर दृष्ट्या परिपूर्ण नसून त्यात त्रुटी असल्याचा त्यांचा दावा होता. या प्रकरणात ६ मे २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने २०१६ ची घटना रद्द करत, सर्व पक्षकारांना पुन्हा सुनावणीची संधी देऊन नवा निर्णय घ्यावा असे निर्देश सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना दिले. त्या पार्श्वभूमीवर २८ ऑगस्ट २०२५ रोजी नव्या विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली.
नवे विश्वस्त मंडळ (एकूण १९ सदस्य) :
१. तहसीलदार, अंबाजोगाई (पदसिद्ध अध्यक्ष)
२. कमलाकर शिवाजीराव चौसाळकर
३. विनोद प्रभूअप्पा दामा
४. हंसराज कमलाकर देशमुख
५. शिरीष शिवाजीराव पांडे
६. ॲड. शरद शिवाजीराव लोमटे
७. श्रीराम अवधूत देशपांडे
८. अक्षय नंदकिशोर मुंदडा
९. उल्हास गोपाळराव पांडे
१०. गौरी ललित जोशी
११. पूजा राम कुलकर्णी
१२. सारंग अरुण पुजारी
१३. राजन मुकुंद पुजारी (गुरव पुजारी प्रतिनिधी – पदसिद्ध, वंशपरंपरेने)
१४. नमिता अक्षय मुंदडा
१५. राजकिशोर कांताप्रसाद मोदी
१६. पृथ्वीराज शिवाजीराव साठे
१७. संजय किसनराव भोसले
१८. भगवान सिताराम शिंदे
१९. गिरीधारीलाल नंदलाल भराडिया
दरम्यान, विश्वस्त मंडळाच्या न्यायालयीन लढाईत अग्रेसर असणारे प्रा. अशोक लोमटे यांचे नाव नवीन विश्वस्त मंडळात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंडळाचा कार्यकाळ व जबाबदाऱ्या
या नव्या विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. मंडळातून अध्यक्ष (तहसीलदार पदसिद्ध), उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष यांची निवड केली जाईल. मंदिराचे धार्मिक विधी, उत्सव, पालखी सोहळे, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, गोशाळा, सामूहिक विवाह अशा उपक्रमांची जबाबदारी नव्या मंडळावर असेल.
पारदर्शकतेवर भर
दरम्यान मंदिरातील दानपेट्या उघडणे, आर्थिक हिशेब, मालमत्ता व्यवस्थापन यामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पंच उपस्थितीची तरतूद नव्याने करण्यात आली आहे. अनेक वर्षांच्या वादानंतर अखेर नव्या विश्वस्त मंडळाच्या स्थापनेमुळे योगेश्वरी मंदिराच्या कारभाराला स्थैर्य मिळण्याची अपेक्षा भक्तांनी व्यक्त केली आहे.