Breaking
Updated: July 30, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelभारत आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थांनी एकत्रितपणे तयार केलेला ‘निसार’ (NISAR) उपग्रह मिशन 30 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5:40 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाणार आहे. इसरोच्या जीएसएलव्ही मार्क II प्रक्षेपकाच्या मदतीने हे मिशन अंतराळात झेप घेईल.
‘निसार’ म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar Mission, जो पृथ्वीवरील सूक्ष्म बदल, नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल आणि पर्यावरणीय घडामोडी यांचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा जगातील पहिला ड्युअल-फ्रिक्वेन्सी रडार तंत्रज्ञान वापरणारा उपग्रह आहे.
निसार उपग्रहात L-बँड आणि S-बँड रडार सिस्टम आहेत. नासाने L-बँड रडार, GPS, डेटा रेकॉर्डर आणि इतर यंत्रणा दिल्या असून, इसरोने S-बँड रडार, उपग्रह बस आणि प्रक्षेपक यांची जबाबदारी घेतली आहे.
हा उपग्रह दर 12 दिवसांनी पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग स्कॅन करेल, म्हणजे दर 6 दिवसांनी नवा डेटा मिळणार. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते ढग, अंधार आणि खराब हवामानातही काम करू शकतो, त्यामुळे 24 तास निरीक्षण शक्य होते.
निसार मिशनचा उद्देश भूकंप, ज्वालामुखी, हिमनद्या, बर्फ वितळणे, भूस्खलन, शेतीतील बदल, पाणी व्यवस्थापन, किनारी भागातील बदल यांचं नेमकं निरीक्षण करणे आहे. भारतासाठी, हा उपग्रह हिमालयातील बर्फाचे प्रमाण, शेती उत्पादन आणि पर्यावरणीय धोके यावर माहिती देईल.
निसार मिशन केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी भविष्यातील पर्यावरणीय आव्हानांशी सामना करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन ठरणार आहे. नासा आणि इसरो यांच्यातील ही ऐतिहासिक भागीदारी वैज्ञानिक प्रगतीसाठी आणि पृथ्वीच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.