Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

खर्चासाठी पैसे नाकारल्याचा राग; सख्या चुलत्याची हत्या करणाऱ्या पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा

Updated: फेब्रुवारी 23, 2026

By Vivek Sindhu

सख्या चुलत्याची हत्या करणाऱ्या पुतण्यास जन्मठेपेची शिक्षा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका कौटुंबिक वादातून झालेल्या भीषण हत्याकांडाचा निकाल देताना आरोपी पुतण्यास सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. घाटनांदूर येथे राहणाऱ्या अर्जुन दत्तात्रय धोंगडे याने आपल्या सख्या चुलत्याकडे खर्चासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, चुलत्याने पैसे देण्यास नकार दिल्याने मनामध्ये राग धरून आरोपीने भररस्त्यात कत्तीने सपासप वार करून चुलत्याची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी आरोपीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ही घटना २०२१ मध्ये घडली होती. मृत जनार्दन धोंगडे हे आपल्या कामावरून घरी परतत असताना आरोपी अर्जुनने त्यांच्यावर हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयताची मुलगी वैशाली वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. सावंत यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी वैशाली आणि प्रत्यक्षदर्शी हनुमंत धोंगडे यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. बचाव पक्षाने आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे सांगत बचावाचा प्रयत्न केला, परंतु सरकारी वकील अॅड. लक्ष्मण फड यांनी तीन डॉक्टरांची साक्ष नोंदवून आरोपीचे कृत्य वेडाच्या भरात झालेले नसून तो मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सिद्ध केले. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून ही कठोर शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील अॅड. लक्ष्मण फड यांना अॅड. सचिन कुलकर्णी आणि पैरवी अधिकारी भाग्यश्री उडाणशीव यांनी सहकार्य केले.


Categories

Recent Posts