अंबाजोगाई : तालुक्यातील नांदगाव येथे चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करून १ लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शाम रतन चव्हाण (रा. नांदगाव) यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शाम चव्हाण हे शेती करून उदरनिर्वाह करतात. २६ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ते व पत्नी अल्का यांनी घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेले होते. दुपारी सव्वा बारा वाजता पुतण्या अक्षय चव्हाण यांनी फोन करून घराचे गेट व दरवाजा उघडे असून कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली. तातडीने घरी परतल्यानंतर भावजई वर्षा चव्हाण यांनी सांगितले की, घरासमोर तीन अनोळखी तरुण उभे होते. त्यांना पाहताच ते मोटारसायकलवरून पसार झाले.
घरात पाहणी केली असता कपाट फोडलेले असून त्यातील दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यात १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व दोन मंगळसूत्र किंमत ६० हजार, ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर किंमत ३६ हजार, दोन ग्रॅम सोन्याच्या मुलांच्या कानातील काड्या किंमत ८ हजार, ५ ग्रॅम सोन्याच्या दोन नथ किंमत २० हजार व रोख ५० हजार रुपये असा एकूण १ लाख ७४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.