Breaking

जवळगाव शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून; मृतदेह ज्वारीच्या शेतात फेकला, गुन्हा दाखल

Updated: डिसेंबर 19, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 12 19 at 19.30.46 f9bd34aa

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : तालुक्यातील जवळगाव शिवारात एका ३० वर्षीय अज्ञात तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह ज्वारीच्या शेतात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या अंगावर गंभीर जखमा आढळून आल्या असून, अज्ञात आरोपींनी ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास बर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश भिवा घुले (वय ३१) यांना या घटनेची माहिती मिळाली. जवळगाव येथील मंचक पंढरी ढवारे यांच्या गायरान जमिनीतील ज्वारीच्या पिकात एका पुरुषाचे प्रेत पालथे पडलेले असल्याचे स्थानिक नागरिक संतोष हारे यांनी कळवले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, मृत तरुणाच्या गळ्यात लाल रंगाचा हातरुमाल आणि अंगावर निळ्या रंगाची जीन्स पँट होती, मात्र अंगात शर्ट नव्हता.

मृताच्या छातीवर, बरगड्यांवर, चेहऱ्यावर आणि गुप्तभागावर मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे आणि बरगड्यांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

हा तपास बर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शंकरराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.


Categories

Recent Posts