Breaking
Updated: नोव्हेंबर 6, 2025
मुरंबी तलाव व मुकुंदराज परिसरात विविध प्रजातीच्या पक्षांची नोंद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपक्षी सप्ताहानिमित्त निसर्गप्रेमी, विद्यार्थी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
अंबाजोगाई : महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान पक्षीशास्त्रज्ञ मारूती चितमपल्ली (५ नोव्हेंबर) आणि डॉ. सलीम अली (१२ नोव्हेंबर) यांच्या जन्मदिनानिमित्त पक्षी सप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने अंबाजोगाई शहरातील पक्षीमित्रांनी बुधवारी मुकुंदराज, नागनाथ व बुट्टेनाथ मंदीर परिसरात, तर गुरुवारी मुरंबी तलाव परिसरात पक्षीनिरीक्षण केले.
या निरीक्षणावेळी विविध प्रजातींचे स्थानिक व स्थलांतरीत पक्षी आढळून आले. निरीक्षणातील सर्व माहिती ‘इ-बर्ड’ या ॲपवर नोंदवण्यात आली. सकाळी ६.३० ते ९ या वेळेत झालेल्या निरीक्षण मोहिमेत शहरातील अनेक पक्षीप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेतला.
या उपक्रमात डॉ. शुभदा लोहिया, प्रा. अभिजित लोहिया, रत्नाकर निकम, रामराव मुंडे, जे. व्ही. कस्तुरे, मुन्ना सोमाणी, प्राचार्य प्रशांत देशमुख, गणेश कदम, हेमंत धानोरकर, प्रा. आदित्य कदम, प्रा. पी. एस. तरकसे, श्रीराम वाशिंबे, प्रशांत बर्दापुरकर, शुभम देशमाने आणि शंकर कराड यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाल पक्षीनिरीक्षक ओजस तारका हेमंत, वरद देशमुख आणि आदित्य कदम यांनीही उत्साहाने निरीक्षण करून पक्षीशास्त्रातील प्रत्यक्ष अनुभव घेतला.
निरीक्षणात आढळलेल्या प्रमुख पक्षी प्रजाती
मुकुंदराज परिसर, बुट्टेनाथ–नागनाथ मंदिर मार्ग व मुरंबी तलाव येथे बोनेलीचा गरुड, हळद्या, चष्मेवाला, वेडा राघू, निलीमा, शेकाट्या, रिव्हर टर्न, कॉमन सँडपाइपर, ग्रे हेरॉन, डार्टर, पांढरी पाणकोंबडी, पानकावळे, नदी कुरव, हळदीकुंकू बदक यांसारखे अनेक आकर्षक पक्षी दिसले.
या उपक्रमामुळे अंबाजोगाई परिसरातील निसर्गप्रेमी आणि विद्यार्थ्यांमध्ये पक्षीसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून पुढील काही दिवसांमध्येही विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण उपक्रम सुरू राहणार आहेत.