केज : मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेल्या वरपगाव (ता. केज) येथील सतीश ज्ञानोबा देशमुख (वय ४५) यांचा पुणे जिल्ह्यातील नारायणगावजवळ हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सतीश देशमुख हे मित्रासोबत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी रवाना झाले होते. नारायणगाव परिसरात आल्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला.
देशमुख कुटुंबावर याआधीच दुःखाचा डोंगर कोसळला होता. तीन वर्षांपूर्वी त्यांचा एक मुलगा विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडला होता. दुसरा मुलगा सध्या पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सतीश देशमुख यांच्या निधनामुळे कुटुंबावर पुन्हा एकदा मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नंदुबाई, मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार आहे.
या अकस्मात निधनामुळे गावात तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
या मृत्यूंना फडणवीस जबाबदार – मनोज जरांगे
सतीश देशमुख यांच्या निधनाने वृत्त कळताच मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.