Breaking
Updated: June 17, 2025
WhatsApp Group
Join Nowधारूर तालुक्यात यंदा २४ हजार हेक्टरवर कपाशी लागवड होण्याचा अंदाज
धारूर : धारूर तालुक्यात पावसाने काही ठिकाणी पेरणीयोग्य हजेरी लावली होती. या पावसावर जमिनीमध्ये काहीसा ओलावाही निर्माण झाला आहे. ओलावा असलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड शुक्रवारी सुरू केली आहे तर तालुक्यातील काही भागात शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात यावर्षी २४ हजार हेक्टरवर कपाशी लागवड होण्याचा अंदाज आहे.
मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पेरणी होत असल्यामुळे शेतकरी मोठी धावपळ करताना दिसत होते. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस होऊन वेळेवर खरिपाच्या पेरण्या होतील असे भाकीत हवामानतज्ज्ञ वर्तवत होते. मृग नक्षत्रात खरिपाची पेरणी झाल्यास पिकास चांगला उतारा येतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे जमिनीत ओलावा झाला होता.
परंतु पुन्हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीत दिल्याने मशागतीची कामे झाली शेतकऱ्यांनी मोठी धावपळ करून मृग नक्षत्रात पाऊस होईल अशी अपेक्षा धरून बीबीयाने आणि खते खरेदी केले आहेत. परंतु तालुक्यातील काही भागात मागील दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे यामुळे जमिनीत काहीसा ओलावा निर्माण झाला आहे. त्या ओलाव्यावरच आंबेवडगाव गावंदरा चोंडी, सोनीमोहा, जहागीरमोहा, गोपाळपूर, चोरंबा, अरणवाडी, चारदरी, घेटेगव्हाण या भागात शेतकऱ्यांनी कपाशी लागवड सुरू केली आहे.
गुरुवारी दुपारनंतर तर शुक्रवारी दिवसभर कपाशीची लागवड झाली. परंतु तांदळवाडी, गांजपूर चिंचपूर, मंदवाडी, धारूर शिवार, खोडस यास मोहखेड, रुई धारूर, अंजनडोह, खोडस, वाघोली याभागात शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाल्यास शेतकरी सोयाबीन पिकाची पेरणी करतात. कापसाप्रमाणेच सोयाबीनचे क्षेत्र ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे परंतु सुरुवातीला शेतकऱ्यांनी डोंगरपट्ट्यातील काही भागात का पाशीची लागवड सुरू केली आहे.
शुक्रवारी दिवसभर ग्रामीण भागात शुकशुकाट होता. शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावामध्ये मजुरांकडून कापसाची लागवड केली. मजुरांना चारशे रुपये पर्यंत कापूस लागवडीचा भाव होता. महिलांसाठी चारशे रुपये तर बैलजोडी साठी दीड हजार रुपयापर्यंत रोजगार देण्यात आला. शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी कशी केली यासाठी धावपळ करताना दिसत होते. तर काही भागांमध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीनकडे कल
यावर्षी काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड सुरू केली आहे. तर आणखी दमदार पाऊस झाल्या नंतर शेतकरी सोयाबीन पिकाची पेरणी करतात कापूस व सोयाबीन हे नगदी पीक असल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळला आहे.