Breaking

शेती करणाऱ्या मुलांना मुली मिळेनात, लग्नासाठी मुलांनाच द्यावा लागतोय हुंडा

Updated: मार्च 9, 2026

By Vivek Sindhu

आ. प्रकाश सोळंकेंनी विधानसभेत मांडली ग्रामीण तरुणांची व्यथा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आ. प्रकाश सोळंकेंनी विधानसभेत मांडली ग्रामीण तरुणांची व्यथा

मुंबई: जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर विधानसभेत महिला सक्षमीकरणावर चर्चा सुरू असताना माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत भीषण आणि ज्वलंत सामाजिक प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने या मुलांच्या कुटुंबांनाच आता हुंडा द्यावा लागत असल्याची धक्कादायक माहिती सोळंके यांनी दिली. या हतबलतेचा फायदा घेऊन फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असून सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.

आमदार सोळंके यांनी मांडलेल्या व्यथेनुसार आज ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली असून प्रत्येक लहान-मोठ्या गावात २५ ते ३० वयोगटातील किमान ५० ते १०० तरुण असे आहेत ज्यांचे शेती व्यवसायामुळे लग्न जमणे कठीण झाले आहे. आजच्या काळात ग्रामीण भागात शेती करणाऱ्या मुलाला मुलगी द्यायला कोणीही तयार नसल्याने एक गंभीर सामाजिक दरी निर्माण होत आहे. या टंचाईमुळे पूर्वी मुलींकडून घेतला जाणारा हुंडा आता मुलांना द्यावा लागत असून त्यातूनच फसवणुकीचे जाळे विणले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बोगस मुली’ आणून त्यांचे विवाह लावून देण्याचे आणि अडीच-तीन लाख रुपये लुटण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. एकाच मुलीचे चार-चार वेळा विवाह लावून तरुणांची फसवणूक केली जात असल्याने ग्रामीण भागातील तरुण नैराश्यातून व्यसनांच्या आहारी जात असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले की आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडलेली परिस्थिती ही अत्यंत वास्तववादी आहे. शासन या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित परिस्थितीचा सखोल अभ्यास करेल आणि यावर आवश्यक त्या उपाययोजना व विशेष योजना आखण्याबाबत विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


Categories

Recent Posts