Breaking
Updated: जानेवारी 23, 2026
आ. नमिता मुंदडा यांनी नगर परिषदेत घेतली आढावा बैठक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर चर्चा, प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी फेसबुक पेज, वेबसाईट तयार करण्याच्या सूचना
अंबाजोगाई: अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज शुक्रवारी नगर परिषदेत आमदार नमिता मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडी यांसारख्या शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, नगरसेवक आणि नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटील चौक हा मार्ग ‘वन वे’ करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच मंडी बाजार, तसेच योगेश्वरी प्राथमिक शाळा ते महाराष्ट्र बँकेपर्यंतच्या रस्त्यावर पी-१ आणि पी-२ पार्किंग व्यवस्था लागू करण्याबाबतचे नियोजन मांडण्यात आले. या संदर्भातील तांत्रिक बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्यासाठी लवकरच उपविभागीय अधिकारी, पोलीस विभाग आणि नगर पालिका यांची संयुक्त बैठक बोलावण्यात येईल, असे आमदार नमिता मुंदडा यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगर परिषदेचे कामकाज अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी नगर परिषदेचे अधिकृत फेसबुक पेज सुरू करण्यासह पालिकेची नवीन वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वच्छतेचे कंत्राट नव्याने काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शेल्टर हाऊस उभारण्याचे नियोजन प्रगतीपथावर असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
प्रशासकीय शिस्त आणि आर्थिक बाबींवर भाष्य करताना नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी कर्मचाऱ्यांना वसुली वाढवण्याचे आदेश दिले. नगर परिषदेचे व्यवस्थापन, विद्युत बिले आणि कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने कर वसुलीवर अधिक भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत कडक पावले उचलण्यात आली असून, लवकरच कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात येणार आहे. सोबतच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात ड्रेस कोड पाळणे आणि ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे. २६ जानेवारीपूर्वी नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आणि फिल्टर पाण्याची सोय करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.