अंबाजोगाई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अंबाजोगाईतील ६६ लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्रांचे वाटप आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. अंबाजोगाई नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास लाभार्थ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की, सर्वांना राहण्यासाठी हक्काचे घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात झाली. सध्या या योजनेचा दुसरा टप्पा सुरु आहे. यापूर्वीच्या टप्प्यात अंबाजोगाई शहरातील ५११ लाभार्थ्यांना या योजनेतून तर १८३ लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेतून घरकुलांचे वाटप झाले.
या वर्षी ६६ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात घरकुल प्रमाणपत्रांचे वाटप करताना मनस्वी आनंद होत आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे अंबाजोगाई नगर पालिका लोकांपर्यंत योजनेचे लाभ पोहोंचविण्यात यशस्वी ठरली.
विकासनिधीची कमतरता पडणार नाही
यापूर्वीच्या काळात लोकहिताच्या योजनांचे लाभ नगर परिषदेमार्फत गरजूंपर्यंत व्यवस्थित पोहोंचत नव्हते. मात्र, आता माझे सर्व बाबींवर बारकाईने लक्ष आहे. मागील काही काळात अंबाजोगाई शहरासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे शहरात अतिशय वेगाने विकासात्मक बदल सुरु असून शहराचा चेहरामोहरा बदलतो आहे. लोकहिताच्या दृष्टीने नगर पालिकेला निधीची कमतरता पडू देणार नाही असा विश्वास आ. मुंदडा यांनी याप्रसंगी नागरिकांना दिला.
योजनेपासून वंचित राहिलेल्यांनी लाभ घ्यावा
पंतप्रधान आवास योजना २०२९ पर्यंत सुरु राहणार आहे. अजूनही या योजनेच्या निकषात बसणाऱ्या कोणी व्यक्तींनी लाभ घेतलेला नसेल तर त्यांनी त्वरित प्रयत्न करावेत असे आवाहन आ. मुंदडा यांनी केले.
या कार्यक्रमात ६६ लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप केज विधानसभा अध्यक्ष शरद इंगळे, शहराध्यक्ष संजय गंभिरे, प्रशांत आदनाक, अनंत अरसुडे, शिरीष मुकडे, अजय राठोड, गोपाळ मस्के यांच्यासह नगर परिषद अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.