सादोळा केंद्राला मिळणार २ लाखांचे. तर मस्साजोगला १ लाखाचे बक्षीस
केज – राज्य शासनाच्या आयुक्त आरोग्यसेवा व मिशन डायरेक्टर नॅशनल हेल्थ मिशनअंतर्गत राबवण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र कायाकल्प पारितोषिक उपक्रमात आरोग्य केंद्र प्रकारात माजलगावातील सादोळा तर उपकेंद्रात केज तालुक्यातील मस्साजोग उपकेंद्रास बीड जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळाला आहे. सादोळ्याला २ लाखांचे, तर मस्साजोगला १ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे.
सार्वजनिक आरोग्य सुविधांची गुणवत्ता वाढवणे. त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता व सर्व अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून आरोग्यदायी वातावरण निर्माण करीत आरोग्य उपकेंद्रातील स्वच्छता, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, इन्फेक्शन कंट्रोल व आरोग्य सेवेतील गुणवत्ता या सर्व आरोग्य उपकेंद्रांची विविध स्तरावर तपासणी करण्यात आली. या सर्व तपासणीमध्ये माजलगावचे सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ९३.१० टक्के गुण मिळाल्याने हे केंद्र जिल्ह्यात अव्वल ठरले, तर केज तालुक्यातील मस्साजोग आरोग्य उपकेंद्रास ९४.२० टक्के गुण मिळाल्याने हे आरोग्य पहिले आहे. सादोळ्याला २ लाखांचे तर मस्साजोगला १ लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
हा पुरस्कार मिळविण्यासाठी या आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी रौफ शेख, सीएचओ डॉ. डी.आर. शेकडे यांचे मार्गदर्शन लाभले. माजलगावचे तालुका आरोग्य अधिकारी मधुकर घुबडे, केजचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी वेळोवेळी भेटी देत मार्गदर्शन व सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. सादोळ्यात डॉ. रमेश घुमरे व डॉ. दत्तात्रेय पारगावकर तर मस्साजोगमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मुळे, आरोग्य सेविका एस. एस. थोरात, आरोग्य सेवक एम. यु. माने, पार्ट टाइम आरोग्य सेविका आर. वाय. शेख हे काम पाहत आहेत. कायाकल्पचे जिल्हा समन्वयक डॉ. दराडे व बापू निकाळजे याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
१३ उपकेंद्रांना उत्तेजनार्थ पारितोषिक केज तालुक्यातील पैठण, दहिफळ वडमाऊली, लाडेगाव, लाडेवडगाव, चंदनसावरगाव, शिरूरघाट, बानेगाव, सारणी (आनंदगाव), टाकळी, धनेगाव, साळेगाव, उंदरी, जाधवजवळा या १३ उपकेंद्रांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाचा प्रयत्न केज तालुक्यातील मस्साजोग आरोग्य उपकेंद्र जिल्ह्यात अव्वल आल्याने मनस्वी आनंद वाटला. यापुढे जास्तीत जास्त उपकेंद्रांना व प्राथमिक आरोग्य केंद्रांना यावर्षी होणाऱ्या राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मिळवण्याचा आमचा मानस आहे. डॉ. अशोक गवळी, तालुका आरोग्य अधिकारी, केज.