Breaking
Updated: June 25, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupपूर्वसूचना, परवानगी न घेताच मिटर बसवण्यास सुरुवात
अंबाजोगाई : सध्या अंबाजोगाई शहरात महावितरणकडून जुने वीज मीटर काढून नवीन ‘स्मार्ट मीटर’ लावण्याचं काम वेगात सुरू आहे; पण या सर्व प्रक्रियेत ना कुठली पूर्वसूचना, ना वीज ग्राहकांची परवानगी घेत, थेट घरासमोर वाहन उभं राहतं, कर्मचारी येतो आणि जुनं मीटर उतरवून नवीन लावतो, अशी स्थिती असल्याने ग्राहकांना हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
दरम्यान, या सर्व प्रकाराने स्थानिकांसह वीज ग्राहक बुचकळ्यात पडले आहेत महावितरणची ही काही नवीन चलाखी तर नाही ना, आता बिल वाढणार का? याचा खर्च आमच्याच खिशातून निघणार का? अशा प्रश्नांनी गावागावात संमिश्र चर्चा सुरू झाली आहे. शहराती एका वयोवृद्ध नागरीकांने सांगितलं, “जुना मीटर सुरूच असताना नवा का लावला? अशी विचारणा केल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने ‘ऑर्डरवर काम चाललंय’ असं उत्तर दिलं. तर नवा मीटर लावल्यानंतर बिलात काही बदल होणार नाही ना, असे विचारल्यावरही त्याने कुठलीच माहिती दिली नाही.” एक गृहिणी म्हणाली, “घरात कोणी मोठं माणूस नसताना मीटर लावायला आले. विचारायला गेलं तर म्हणाले ऑर्डर आहे वरून, असे उत्तर दिले गेले.” या सर्व प्रकारामुळे नागरीकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
आर्थिक भाराची भीती
महावितरणने जर हे काम सरकारी आदेशावर सुरू केले असेल, तर ते पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने होणे आवश्यक आहे. कारण शेवटी यातून वीज ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक भार पडतो, अशी भीती आता गावागावांत पसरू लागली आहे. आता नवीन स्मार्ट मीटरद्वारे पडणाऱ्या रीडिंगनुसार येणारे नवीन बिलच ग्राहकांचा संभ्रम दूर करतो की काय? असा प्रश्न सध्या उपस्थित राहात आहे.
ग्राहकांची मागणी
या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता हवी, मीटर बदलण्यापूर्वी लेखी सूचना द्याव्यात, ग्राहकांची लेखी संमती घेऊनच मीटर लावावे, बदलामुळे जर दरवाढ होणार असेल, तर ती स्पष्टपणे जाहीर करावी, गावपातळीवर सभांद्वारे माहिती दिली जावी.
लावण्यात येत असलेले हे मीटर ‘स्मार्ट मीटर’ आहेत. त्यामुळे वीज वापराचे अचूक वाचन होईल, वेळेवर बिल मिळेल, रिमोट रीडिंग होईल. अंबाजोगाई शहरात स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरु असून नागरीकांनी अचूक मीटर रीडिंगसाठी हे मीटर बसवून घ्यावे.
– सतीश कानडे (उपकार्यकारी अभियंता, अंबाजोगाई)
स्मार्ट मीटरमुळे जास्त बील येत आहे. रीडिंग कार्यालयात बसून कळणार असल्याने किती पारर्दशक होईल यावर शंका आहे. काही दिवसानंतर हेच मीटर प्रिपेड होणार असून नागरीकांना लाईट सुरु ठेवण्यासाठी अगोदरच पैस भरावे लागतील. यामुळे हे मीटर तात्काळ बसवण्याचे बंद करावे अशी मागणी निवेदनाव्दारे महावितरणकडे करण्यात आली आहे.
– राजकिशोर मोदी (माजी नगराध्यक्ष, अंबाजोगाई )