Breaking
Updated: फेब्रुवारी 21, 2026
पतीसह तिघांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : चनई येथे सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापु पि. अर्जुन कांबळे (रा. डिसकळ, ता. कळंब, जि. धाराशीव) यांची मुलगी भाग्यश्री हिचे लग्न पाच वर्षांपूर्वी चनई येथील अजय तुकाराम चौरे याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही काळ ठीक गेल्यानंतर पती अजय याला दारूचे व्यसन जडले. तो भाग्यश्रीला सतत मारहाण करत असे, तर सासू अयोध्या आणि सासरे तुकाराम हे तिला घरकाम येत नाही आणि तू संसार करू शकत नाहीस असे म्हणून टोमणे मारून मानसिक छळ करत होते. दरम्यान, नात आम्रपाली आजारी असताना उपचारासाठी पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. गरिबीमुळे बापु कांबळे यांनी दोन-तीन हजार रुपये पाठवले, मात्र पूर्ण पैसे का दिले नाहीत यावरून अजयने भाग्यश्रीला मारून टाकण्याची धमकी दिली होती.
या जाचाला कंटाळून भाग्यश्रीने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरासमोरील सीताफळीच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या माहेरच्यांनी अंबाजोगाईत धाव घेतली. मुलीच्या मृत्यूस पती अजय तुकाराम चौरे, सासू अयोध्या तुकाराम चौरे आणि सासरे तुकाराम चौरे हे जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ११५(२), ३(५), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविकुमार राजेंद्र पवार करत आहेत.