Breaking
Updated: डिसेंबर 23, 2025
चौघांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: तालुक्यातील ढाकेफळ येथे मैत्रीचे संबंध अधिकृतपणे तोडल्यानंतरही एका तरुणीने तरुणाच्या घरात घुसून गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढाकेफळ येथील एक तरुण लातूर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे. त्याचे आणि त्याच गावातील एका तरुणीचे गेल्या काही काळापासून मैत्रीचे संबंध होते. मात्र, या संबंधांमुळे वाद निर्माण होऊ लागल्याने दोन्ही कुटुंबांनी मध्यस्थी केली होती. १४ डिसेंबर रोजी संबंधित तरुणाच्या मोठ्या भावाच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असताना या तरुणीने तिथे जाऊन मोठा गोंधळ घातला होता. त्यावेळी नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर, दोघांमधील संबंध पूर्णतः संपल्याचे नोटरीमार्फत लेखी शपथपत्र तयार करून कायदेशीररीत्या जाहीर करण्यात आले होते.
असे असतानाही २२ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास ही तरुणी पुन्हा संबंधित तरुणाच्या घरात अनधिकृतपणे शिरली. घराच्या दरवाजावर थुंकल्यामुळे तरुणाच्या वडिलांनी तिला जाब विचारला असता, तिने त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच याच घरात येऊन राहणार असल्याची धमकी देत गंभीर परिणामांचा इशारा दिला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून तरुणाच्या कुटुंबीयांनी भीती व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार केशव खाडे हे करीत आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करून पुढील कायदेशीर कारवाईची दिशा ठरवत आहेत.