नागपूर : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी आक्रमकपणे लावून धरत मनोज जरांगे पाटील हजारो प्रतिनिधींसह मुंबईकडे निघाले आहेत. काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अनेक नेते त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये, या भूमिकेवर ठाम राहून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ३० ऑगस्टपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून २७ टक्के आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी केली आहे. जिल्ह्या-जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी त्यांच्या आंदोलनात सहभागी होत असून सरकारवर दबाव वाढत आहे. आंदोलकांच्या या दबावामुळे राज्य सरकार मागण्यांना मान्यता देईल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक गुरुवारी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत शंभर जण प्रत्यक्ष तर काही प्रतिनिधी ऑनलाइन सहभागी झाले. सर्वांनी एकमताने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मात्र ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात कुठलाही हस्तक्षेप मान्य नाही, अशी ठाम भूमिका मांडली.
बैठकीत ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात नागपूर येथे साखळी उपोषण होईल. त्यानंतर आमरण उपोषण आणि परिस्थितीनुसार मुंबईकडे मोर्चा काढला जाणार आहे. या बैठकीला बुलढाणा, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.