Breaking

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास १० वर्षांची सक्त मजुरी

Updated: जानेवारी 23, 2026

By Vivek Sindhu

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास १० वर्षांची सक्त मजुरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याच्या आणि तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात बीड येथील न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२१ मध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेतील आरोपीला न्यायालयाने १० वर्षांची सक्त मजुरी आणि ९००० रुपये दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण झाला असून बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, २६ मे २०२१ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जी. एच. पठाण यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून २९ मे २०२१ रोजी आरोपी सर्फराज रशीद सय्यद याला अटक केली. तपासादरम्यान पीडित मुलगी आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, आरोपीने मुलीवर बळजबरी केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी या प्रकरणात शास्त्रीय पद्धतीने पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ व्हि. एच. पाटवदकर यांच्यासमोर झाली. सरकारी वकील सुहास सुलाखे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. सर्व साक्षी-पुरावे तपासून २० जानेवारी २०२६ रोजी न्यायालयाने आरोपी सर्फराज रशीद सय्यद याला दोषी ठरवले. तपास अधिकारी जी. एच. पठाण यांना या कामात पोलीस हवालदार सिराज पठाण, सुभाष मोठे आणि पैरवी अधिकारी बाळासाहेब सानप यांनी मोलाची मदत केली.