Breaking
Updated: डिसेंबर 17, 2025
‘मला आई व्हायचंय’ म्हणत २५ लाखांच्या ‘प्रेग्नन्सी जॉब’चे आमिष; तरुणांना लुटणारी हायटेक टोळी सक्रिय
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelछत्रपती संभाजीनगर: ‘मला आई बनवण्यासाठी मदत करा, त्याबदल्यात मी २५ लाख रुपये द्यायला तयार आहे’, अशा धक्कादायक मेसेजद्वारे तरुणांना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. शहरात ‘प्रेग्नन्सी जॉब’च्या नावाखाली सुरू असलेल्या या सायबर गुन्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले, कामगार आणि तरुण मोठ्या संख्येने बळी पडत आहेत. गेल्या महिनाभरात असे सहा प्रकार उघडकीस आले असून सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर श्रीमंत महिलांचे बनावट प्रोफाइल तयार करतात. त्यानंतर तरुणांना ‘खूप दिवसांपासून अपत्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र गर्भधारणा होत नाही, मला आई बनायचे आहे’, असे भावनिक मेसेज पाठवले जातात. या कामासाठी लाखो रुपयांचे आमिष दाखवले जाते. एकदा तरुण जाळ्यात अडकला की, नोंदणी शुल्क, ओळख पडताळणी, जीएसटी आणि सुरक्षा अनामत रक्कमेच्या नावाखाली त्यांच्याकडून हजारो रुपये उकळले जातात. याशिवाय, निवडीच्या बहाण्याने व्हिडिओ कॉलवर तरुणांना अश्लील चाळे करण्यास सांगून त्याचे चित्रीकरण केले जाते. हे व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याची किंवा व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू होतो.
याप्रकरणी वाळूज येथील एका कंपनीत काम करणाऱ्या २६ वर्षीय अकाउंटंट तरुणाची फसवणूक झाली आहे. त्याला ‘प्रेग्नन्सी जॉब’साठी ४० हजार रुपये महिना पगार आणि कामाचे २५ लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवण्यात आले होते. या हव्यासापोटी त्याने नोंदणीसाठी ८ हजार रुपये भरले. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका ग्रामीण भागातील युवकाने टेलिग्रामवरील जाहिरातीला भुलून १५ हजार रुपये गमावले. एका पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवरील जाहिरातीद्वारे तो धर्मेंद्र पटेल आणि ज्योती शर्मा यांच्या संपर्कात आला होता. त्यांनी विविध करणांनी पैसे उकळून नंतर त्याचे नंबर ब्लॉक केले.
झारखंडमधील टोळ्या या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. या गुन्हेगारांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही ऑफर्सना कायदेशीर अस्तित्व नसते. सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक भावनांचा गैरफायदा घेणाऱ्या अशा मेसेजेसला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी किंवा १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी केले आहे.