Breaking
Updated: जानेवारी 6, 2026
परळीत चंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश; ८.२१ लाखांच्या मुद्देमालासह ७ तस्कर जेरबंद
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: तालुक्यातील धर्मापुरी ते पानगाव रस्त्यावरील गायरान परिसरात बेकायदेशीरपणे चंदनाची खरेदी-विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका टोळीचा अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी सुमारे ८ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांनी ही धाडसी कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळावरून १०४ किलो चंदनाचे लाकूड आणि ३९ किलो चंदनाची साल असा एकूण सुमारे ३ लाख रुपयांचा वनसाठा हस्तगत केला. यासह तस्करीसाठी वापरली जाणारी टाटा इंडिगो कार, दोन दुचाकी, सात मोबाईल फोन आणि चंदनाची तोड करण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा एकूण ८ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पप्पू बाबुराव सूर्यवंशी, राहुल पप्पू सूर्यवंशी, तेजस कल्लप्पा कांळीबे, नितीन सटवा जाधव, अविनाश व्यंकट जाधव, व्यंकट रामचंद्र जाधव आणि भारत निवृत्ती गायकवाड या सात जणांना अटक केली आहे. आरोपींपैकी काही जण परळी शहरातील रहिवासी असून दोन आरोपी उदगीर तर एक आरोपी माजलगाव तालुक्यातील रहिवासी आहे. या कारवाईमुळे चंदन तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार सतेश कांगणे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३१७(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक असद शेख, पोलीस उपनिरीक्षक निमोने आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.