Breaking
Updated: मार्च 1, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: बीड जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत अंबाजोगाई शहरातील परळी रोडवरील एका वसाहतीतून तब्बल १३ लाख ७० हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २८ किलो गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ साठा, विक्री आणि वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि अंबाजोगाई शहर पोलिसांनी ही संयुक्त कामगिरी केली.
शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, अंबाजोगाई येथील परळी रोडवरील वसाहतीत एका चारचाकी वाहनातून गांजाची अवैध विक्री व वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित पांढऱ्या रंगाच्या कारची झडती घेतली असता, त्यात दोन निळ्या रंगाच्या प्लास्टिक पोत्यांमध्ये २८ किलो ओलसर आणि उग्र वासाचा गांजा मिळून आला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रतीम राम तरकसे (वय २७, रा. आडस, ता. केज), प्रतीक भगवान पाटोले, अजय पाटोळे (दोन्ही रा. आसरडोह, ता. धारूर) आणि अजय देवकर (रा. अंदोरा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या विविध कलमान्वये (NDPS Act) गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक शरद जोगदंड पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहर पोलीस निरिक्षक शरद जोगदंड, उपनिरीक्षक सुशांत सुतळे, उपनिरीक्षक शिंदे, पो.ह. मारुती कांबळे, रामचंद्र केकाण, सुनिल अलगट, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे, व पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर येथील पो.ह. वडकर, गायकवाड, तेजेस वाहुळे, पोलीस अंमलदार चादर गायकवाड, आय बाईक अंमलदार खरटमोल यांनी मिळून केली आहे.