माजलगाव : मराठवाड्यात क्र.२चे असलेल्या माजलगाव धरणात पाण्याची आवक वाढली असून अवघ्या दोन दिवसांत धरणाची पाणी पातळी २५%ने वाढली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ९०%झाली आसल्याने धरणात पाण्याची आवक येत असल्याने कोणत्याही क्षणी माजलगाव धरणातून पाणी सोडले जावू शकते. म्हणून प्रशासनाच्यावतीने सिंधफनानदी काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
माजलगाव शहराजवळ असलेल्या सिंधफनानदीवर १९८० साली माजलगाव धरण बांधण्यात आले होते आणि हे मराठवाड्यातील क्र. २ क्रमांकाचे धरण मानले जाते. या धरणातून माजलगाव शहरासह बीड शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराजवळील पुनर्वसित ११ गावांसह अनेक गावांना तसेच एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जात आहे. माजलगाव तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन या धरणातील पाण्यावर सिंचनाखाली येते. तसेच परभणी व नांदेड जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन आणि परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठीही याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो.
काल दोन दिवसांपूर्वी झालेल्या सततच्या पावसामुळे, ६५% पातळीवर असलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणाची पातळी २५% ने वाढून आज ९०% भरली असून, धरणात सध्या २५ हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढत असल्याने कोणत्याही क्षणी सिंधफनानदीत पाणी सोडले जाऊ शकते.
सिंधफनानदीकाठी असलेल्या मनुर, शिंपेटाकळी, लुखेगाव, साडंसचिंचोली, रोषणपुरी, डेपेगाव, मंजरथ, आळसेवाडीसह इतर गावांना धरणातून पाणी सोडल्यामुळे पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांचे गोठे, पाळीव प्राणी व मानवहानी टाळण्यासाठी माजलगाव उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, तहसीलदार संतोष रुईकर यांनी खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही क्षणी माजलगाव धरणातून पाणी सोडले जाऊ शकते, याची नागरिकांनी जाणीव ठेवावी. असे आवाहन केले आहे.