सासर आणि माहेरचे सर्व नातेवाईक, ग्रामस्त देखील सहभागी
बीड – जिल्ह्यातील महादेव मुंडे खून प्रकरणात अद्याप तपासाला गती मिळालेली नाही. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळी अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या सासर आणि माहेर मधील सर्व नातेवाईक देखील सहभागी झाले आहेत.
परळी तील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासासाठी 10 जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात एक सहायक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक आणि 8 कर्मचारी आहेत. तांत्रिक पुराव्यांवर पोलिस भर देत आहेत. हत्येत सहभागाचा आरोप झालेला आणि मकोकामध्ये फरार असलेला गोट्या गिते पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र, तरी देखील आरोपींना अटक होत नसल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
मनोज जरांगे यांचीही घेतली होती भेट
मागिल सोमवारीच मनोज जरांगे यांनी परळीत ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली होती. खासदार बजरंग सोनवणे यांनी आपण या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. परळीतील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांची 18 महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. ही हत्या कुणी आणि का केली याचा तपास अद्याप लागलेला नाही. या प्रकरणात आतापर्यंत 8 तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. मात्र, आरोपी निष्पन्न झाले नाही. सोमवारी मनोज जरांगे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळीत भेट घेतली. आपण कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
शवविच्छेदन अहवालात धक्कादायक तपशील
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे, ज्यात काही धक्कादायक तपशील समोर आले आहेत. महादेव मुंडे यांच्या गळ्यावर खूप तीव्र वार केले होते, ज्याची लांबी 20 सेंमी, रुंदी 7 सेंमी आणि खोली 3 सेंमी होती. यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार केले गेले होते. एकूण महादेव मुंडे यांच्या अंगावर 16 ठिकाणी वार झाले होते. त्यात त्यांचे हातही प्रतिकार करत असताना जखमी झाले होते, ज्याची नोंद शवविच्छेदन अहवालामध्ये करण्यात आली आहे. 22 ऑक्टोबर रोजी सव्वा तास शवविच्छेदन पार पडले, ज्यावेळी मृत्यूचे कारण अति रक्तस्राव आणि शॉक झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. शवविच्छेदन रिपोर्टमध्ये महादेव मुंडे यांचे शरीर रक्ताने माखलेले होते. त्यांचा शर्ट ब्राऊन रंगाचा आणि बनियान पांढरी होती. तसेच त्यांच्याकडे लाल करदोडा आणि पाकीट होते. मृतदेहाच्या जखमांमध्ये चेहरा, छाती, आणि हातांवर घाव असल्याचे यात समोर आले आहे.
विजयसिंह बांगर यांचे गंभीर आरोप
या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. वाल्मीक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडेंना हालहाल करून मारल्याचा आरोप विजय बांगर यांनी केला आहे. महादेव मुंडे यांच्या शवविच्छेदनाचे रिपोर्ट माझ्या हाती आले आहेत. त्यानुसार, त्यांच्या शरीरावर 15 ते 16 खोलवर जखमा असून अमानुष मारहाण असल्याचे यात उघड होत असल्याचे विजय बांगर यांनी सांगितले. महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याचा मुलगा श्री कराड आणि त्यांचे साथीदार सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. महादेव मुंडे घरी जात असताना कराडचा मुलगा श्री आणि त्याच्या साथीदाराने रेकी केली आणि हत्या केली. मुंडेंचा जीव जागेवर गेला नाही, तर क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या पायावर जखमा करण्यात आल्या. रेंगाळत असताना गालावर वार केला, नंतर अन्न नलिकेवर वार करण्यात आला. या सर्व जखमा खोलवर आहेत. मी खोट बोलत नाही, फोटोत ते स्पष्ट दिसत आहे. त्यांचा जीव थोडा राहिला होता, त्यावेळी मानेवर मार देण्यात आला. किमान 20 मिनिटे मारहाण झाली, असे विजय बांगर यांनी सांगितले.