Breaking
Updated: मार्च 26, 2026
प्रकरणातील एकाला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- दुचाकी वरून आलेल्या दोघांनी एका व्यापाऱ्याचा मोबाईल व नगदी दोन हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना केज शहरात घडली होती. या प्रकरणी दोघां विरुद्ध गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीला त्याने गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलीसह ताब्यात घेतले.
केज शहरातील समता नगर भागातील व्यापारी बाळासाहेब सोपानराव घुले हे २३ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास मोबाईलवर बोलत त्यांच्या दुकानाकडे पायी जात असताना दुचाकी वरून आलेल्या दोघांनी त्यांना दुचाकी आडवी लावली. त्यांच्याकडे रागाने बघत १० हजार रुपयांचा मोबाईल व २ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन निघून गेले होते.
व्यापाऱ्याने ही माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेची तपासणी केली असता सराईत गुन्हेगार आवड्या उर्फ आवेज शेख (रा. कोकीजपिर, केज), सोहेल मोहम्मद शेख (रा. अजीजपुरा, केज) या दोघांनी मोबाईल व पैसे हिसकावून नेल्याचे स्पष्ट झाले होते.
बाळासाहेब घुले यांच्या फिर्यादी वरून आवड्या उर्फ आवेज शेख, सोहेल मोहम्मद शेख या दोघां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १४९/२०२६ भा. न्या. सं. ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान दिनांक २४ मार्च रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार जोगदंड, पोलिस हवालदार दिलीप गित्ते, पोलिस हवालदार मरांडे यांनी आवेज उर्फ आवड्या खाजा शेख (रा. केज) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार सोहेल शेख याचेसह गुन्हा केला असल्याचे कबूल केले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रायडर मोटार सायकल जप्त केली आहे. तसेच पोलिस फरार आरोपी सोहेल शेख यांचा शोध घेत आहेत.