Breaking
Updated: मार्च 25, 2026
पशुधन पर्यवेक्षकाचा रस्ता अडवून लोखंडी गजाने मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelशिरूर कासार: शासकीय कामासाठी जात असलेल्या एका खासगी पशुधन पर्यवेक्षकाला नऊ जणांच्या टोळीने रस्ता अडवून लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्लेखोरांनी पर्यवेक्षकाला त्याच्याच कारमध्ये बसवून बस स्थानकावर नेऊन तेथेही मारहाण केली.
भारत एकनाथ शिंदे (वय ४२, रा. गोमळवाडा) हे खासगी पशुधन पर्यवेक्षक म्हणून काम करतात. २१ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या कारने (MH 17 AJ 9947) गोमळवाडा येथून डोंगरकिन्हीकडे शासकीय कामासाठी जात होते. नांदूर फाटा आणि सिंदफणा बस स्थानकाजवळ भारत शिवाजी पवार, शुभम पवार, रामहारी पवार आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून शिंदे यांची कार अडवली.
आरोपींनी शिंदे यांना गाडीखाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना बळजबरीने त्यांच्याच कारमध्ये बसवून बस स्टँडवर नेले. तिथे भारत पवार याने आपल्या हातातील लोखंडी गजाने शिंदे यांच्या डाव्या भुवईवर जोरात प्रहार करून त्यांना जखमी केले. इतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जायभाये पुढील तपास करत आहेत.