वाहतूक कोंडीने मुंबई ठप्प; इस्टर्न फ्री वे वर वाहनांच्या अनेक किलोमीटरच्या रांगा
मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आणि सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. हजारो गाड्यांच्या ताफ्यासह लाखो आंदोलक मुंबईत पोहोचले असून, चेंबूर ते छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली. सध्या पूर्व मुक्त महामार्गावर (Eastern Free Way) मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या अनेक किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.
आझाद मैदानावर उपोषण
सकाळी १० वाजता मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर दाखल झाले आणि त्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी त्यांना फक्त आठ तास (सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) उपोषण करण्याची परवानगी दिली होती. मात्र मंचावर भाषण करताना जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला. “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. आम्हाला बेमुदत उपोषणाची परवानगी द्या. मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय आणि अंगावर गुलाल पडल्याशिवाय कुणी इथून हलणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही” असे जरांगे म्हणाले.
जरांगे यांचा मास्टरस्ट्रोक
आंदोलनाच्या सुरुवातीला जरांगे पाटलांनी मास्टरस्ट्रोक खेळला. स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली आणि आरती करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात आंदोलनामुळे अडचण येईल, असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. मात्र गणपतीची मूर्ती ठेवून जरांगे यांनी “गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही” हा संदेश दिला. या पावलाने मुंबईतील गणेशभक्तांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे.
वाहतूक कोंडीने मुंबई ठप्प
आझाद मैदानाकडे आंदोलकांचा मोर्चा वळल्याने मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. सीएसएमटी परिसरात बेस्ट बस, टॅक्सी व खाजगी वाहनांचा खोळंबा झाला. कुलाबा भागात मोठी वाहतूक कोंडी झाली. मानखूर्दमध्ये आंदोलकांच्या गाड्या अडवण्यात आल्याने चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कोस्टल रोडवरील ब्रीच कँडी एक्झिटजवळ वाहनांची गर्दी झाली. तर मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तब्बल १० किलोमीटर लांब रांगा लागल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
राजकीय नेत्यांचा पाठिंबा
आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेऊन चर्चा केली. संदीप क्षीरसागर यांनी आधीपासूनच जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. अलीकडेच त्यांनी “चलो मुंबई” असा नारा दिला होता. प्रकाश सोळंके यांनीदेखील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. यासोबतच इतरही अनेक नेते आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यात आहे.
सरकारसमोरील पेच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच “१० टक्के आरक्षण दिले आहे, आंदोलकांनी अभ्यास करून मागण्या कराव्यात” असे म्हटले होते. मात्र जरांगे यांनी ठाम भूमिका घेतल्याने सरकारसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यायालयाने दिलेली आठ तासांची मुदत संपल्यानंतर जरांगे मैदान सोडणार नाहीत, हे स्पष्ट झाले असून, त्यामुळे **सरकारला आता पुढचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या या आरपारच्या लढ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.