आष्टी : तालुक्यातील शिराळ येथील रमेश रोहीदास जगताप या मजुराचा रस्ते कामावर भीषण अपघातात मृत्यू झाला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पुलाच्या बांधकामावर ते मजुरीसाठी गेले असताना गुरुवारी दुपारी सिमेंट मिक्सरला हायवाने दिलेल्या जोरदार धडकेत मिक्सर पलटी होऊन ते दबले गेले.
रमेश जगताप हे रोज मजुरीसाठी गावातील सहकाऱ्यांसोबत टेम्पोने कामावर जात होते. 14 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास खुंटेफळ ते बाळेवाडी रोडवरील कुंबेफळ शिवारातील पुलाजवळ सिमेंट मिक्सरजवळ ते काम करत होते. दरम्यान शिराळ येथील सुनिल दिनकर आजबे याने हायवा निष्काळजीपणे चालवून मिक्सरला धडक दिली. या भीषण धडकेत मिक्सर उलटून रमेश जगताप यांच्यावर पडला आणि त्यात दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना प्रत्यक्ष साक्षीदारांसह नातेवाईकांच्या डोळ्यांसमोर घडली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मृताचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून अपघातामुळे घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंभोरा पोलिसांनी फिर्याद नोंदवून हायवा चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.