आष्टी : शहरातील मुर्शदपूर येथील ओमशांती कॉलनीत बुधवारी (दि. २७) सायंकाळी पाचच्या सुमारास एका घरातील जिन्याखाली ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने या वेळी घरातील सर्व सदस्य गणेश मूर्ती आणण्यासाठी बाहेर गेल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले.
ओमशांती कॉलनीत राहणारे अविनाश नानासाहेब पवळ हे आपल्या कुटुंबासह राहत होते. गणेशोत्सवासाठी मूर्ती आणण्यासाठी पवळ कुटुंब घराला कुलूप लावून शहरात गेले असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की परिसर हादरून गेला.
शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तांदळे, अंमलदार तांबे, गुजर, गुंडाळे, राऊत तसेच वाहन चालक हवालदार गोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु गणरायाच्या आगमनावेळी कुटुंब घराबाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला.