Breaking
Updated: ऑक्टोबर 10, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुणबी नोंदींच्या शोध मोहिमेने राज्यातील राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. हजारो मराठा बांधवांना त्यांच्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी सापडत असून, त्यांना ओबीसी प्रवर्गातील सवलतींसह शिक्षण, नोकरी आणि आता राजकीय आरक्षणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. या नव्या घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नवे समीकरण तयार होताना दिसत आहे.
राज्यात सोमवारी नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. यात अंबाजोगाई नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठरले. त्या पाठोपाठ बुधवारी शहरातील प्रभागनिहाय आरक्षणही निश्चित करण्यात आले. या सोडतीनंतर ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या काही प्रभागांवर कुणबी नोंदी असलेले मराठा उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अनेकांनी आपल्या दस्तऐवजांसह उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू केली आहे. त्यामुळे अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुका या वेळी पारंपरिक जातीय गणितांच्या पलीकडे जाऊन नव्या सामाजिक समीकरणांच्या पद्धतीने पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ओबीसी आरक्षणाच्या प्रभागांवर कुणबी प्रमाणपत्र असलेले मराठा उमेदवार उतरले, तर राजकीय पक्षांसमोर मोठी कसोटी उभी राहणार आहे. ओबीसी प्रवर्गात उमेदवारी देताना कुणबी प्रमाणपत्रधारक उमेदवारांना तिकीट द्यावे की, पारंपरिक ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे, याबाबत पक्षांतर्गत मोठी चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत मराठा समाजातील उमेदवार ओबीसी आरक्षणात उतरल्यानं स्थानिक स्तरावर जातीय समीकरणाचा ताण वाढू शकतो.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात जातीय चळवळींना वेग आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनानंतर अनेकांनी आपल्या पूर्वजांची कुणबी नोंद शोधून ती अधिकृतरीत्या मान्य करून घेतली आहे. ही प्रक्रिया आता राजकीय पातळीवर पोहोचली असून, स्थानिक निवडणुकांतील ओबीसी आरक्षण हे त्याचे नवे रणांगण बनत आहे. यामुळे पारंपरिक ओबीसी समाजातील मतदार आणि मराठा-कुणबी मतदारांमध्ये थेट स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
अंबाजोगाई शहरात १५ प्रभागातून असून त्यातून ३१ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. यापैकी आठ जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत. या प्रभागांत आता मराठा समाजातील अनेक इच्छुक कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शहरातील आगामी निवडणुकीत जातीय मतांचे ध्रुवीकरण अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय पक्षांनी कुणबी नोंद असलेल्या मराठा उमेदवारांना संधी दिल्यास मतदारसंघाचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते. कारण, मराठा-कुणबी हे राज्यातील सर्वाधिक संख्येने असलेला घटक असून, त्यांचा कल निवडणुकीचा निकाल ठरवणारा ठरतो. त्यामुळे कोणता पक्ष कुणाला संधी देतो, कोणता समाज कुणाच्या पाठीशी उभा राहतो आणि या नव्या कुणबी नोंदीचा लाभ कोणत्या पक्षाला मिळतो, हे नगरपालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.