Breaking
Updated: June 11, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकृषी विभाग व नॅचरल शुगरचा संयुक्त उपक्रम
अंबाजोगाई – कृषी विभाग, नॅचरल शुगर रांजनी यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोदा येथे शेतकऱ्यांची शेतीशाळा आयोजित करून खरीप हंगाम व ऊस पिकाचे सद्यस्थितीत करावयाचे व्यवस्थापन अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर कदम यांनी सोयाबीन पिकाचे विविध वाण, बियाणे उगवण क्षमता बाबत मार्गदर्शन केले.
ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी हुमणी अळीचा जीवनक्रम समजावून सांगून या अळीमुळे होणारे नुकसान बाबत माहिती दिली तसेच सद्यस्थितीत पाऊस पडल्यामुळे कडुलिंबाच्या झाडांवर हुमणी अळीचे प्रौढ निदर्शनास येत असल्याने हुमणी अळी प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी प्रकाश सापळे, एरंड सापळे, कामगंध सापळे लावणे तसेच सोयाबीन पिकामधील पिवळा मोझॅक विषाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेमुळे निर्माण होणारा पिवळसरपणा यामधील फरक आणि याचे व्यवस्थापन तसेच ऊस पिकामधील चाबुक काणी, गवताळ वाढ रोग आणि पोक्का बोईंग रोग, कांडी कीड, लोकरी मावा, पिठ्या ढेकूण व्यवस्थापन संदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे बेड तयार करून टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करणे आणि शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे संदर्भात माहिती दिली.
बेस्ट ऍग्रो कंपनीचे प्रतिनिधी सुंदर उबाळे यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी कृषी पर्यवेक्षक वैभव भिसे तसेच अविनाश उगले, विजयकुमार देशमुख, राम पन्हाळे, महारुद्र हौसेकर, किसन उगले, धनराज पन्हाळे, दशरथ उगले, संतोष लोहिया व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे करा ऊसातील पोक्का बोईंग, चाबुक काणी, गवताळ वाढ, कांडी कीड व्यवस्थापनचाबुक काणी प्रादुर्भावग्रस्त उसाचे फुटवे विळ्याने कापून घेऊन त्याची काजळी शेतामध्ये पडू न देता व्यवस्थित प्लास्टिकच्या पोत्यात भरून शेता बाहेर नेऊन जाळून टाकावेत त्यानंतर जमिनीखाली राहिलेले उसाचे बेट इतर अवशेष काढून नष्ट करावेत यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होईल.
उसावर पोक्का बोईंग व शेंडा कूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर व्यवस्थापनासाठी १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.काही ठिकाणी चुनखडी युक्त पांढऱ्या जमिनीवर सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेमुळे ऊस पिकाची पाने पिवळी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता म्हणजेच क्लोरोसिस (हरितरोग) ही विकृती असून याच्या व्यवस्थापनासाठी १३:४०:१३ हे फॉलियर ग्रेड विद्राव्य खत ५ ग्रॅम अधिक मॅग्नेशियम सल्फेट दोन ग्रॅम अधिक महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यातून फवारणी करावी.
गवताळ वाढीची बेटे आढळल्यास ती मुळासकट काढून जाळून नष्ट करावीत.फुले २६५ ऊस जातीच्या संकरातून तयार झालेल्या ऊस जातीमध्ये तांबेरा, पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी ३ ग्रॅम मॅन्कोझेब प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.ऊस पिकातील कांडी कीड व्यवस्थापनासाठी क्लोरअँट्रानिलीप्रोल (०.४ टक्का) हे दाणेदार कीटकनाशक हेक्टरी १८.७५ किलो याप्रमाणे पावसाळी खतासोबत पेरून द्यावे.
शिवप्रसाद येळकर, ऊस विकास अधिकारी, नॅचरल शुगर रांजणी.