Breaking
Updated: डिसेंबर 10, 2025
२३ व्हिडिओ क्लिप्सनी उलगडली क्रूरता
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelरस्ते, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा आणि नगरविकास विभागा विषयी सभागृहात मांडल्या महत्त्वपूर्ण मागण्या
अंबाजोगाई / नागपूर : नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. सन २०२५-२६ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी रस्ते, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा आणि नगरविकास विभागाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर आपली भूमिका मांडत मतदारसंघाच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सक्षमीकरण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. युसुफवडगाव, नेकनूर आणि अंबाजोगाई येथील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्याच्या इमारतींची दुरवस्था झाली असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि पुनर्बांधणीसाठी तातडीने निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच वाढते शहरीकरण, विद्यार्थ्यांची संख्या आणि लोकसंख्या लक्षात घेता अंबाजोगाई शहरात अतिरिक्त पोलीस ठाणे निर्माण करणे गरजेचे आहे. यासह रविवार पेठ आणि लोखंडी सावरगाव येथे नवीन पोलीस चौक्या मंजूर कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी सभागृहात केली.
रस्ते विकास आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर बोलताना आमदार मुंदडा यांनी केज आणि अंबाजोगाई या दोन्ही प्रमुख शहरांमधील वाहतूक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राष्ट्रीय महामार्गावरील जंक्शनवर होणारे अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल किंवा रिंग रोड स्वरूपातील बायपास मार्गांना तत्काळ मंजुरी मिळणे अत्यावश्यक आहे. यासोबतच ग्रामीण भागातील वाडी, वस्ती आणि तांड्यांवरील रस्त्यांना मार्ग क्रमांक देऊन त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण करावे. तसेच अंबाजोगाई व केज या दोन्ही शहरांमधील शासकीय विश्रामगृहांच्या (व्हीआयपी) प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली.
नगरविकास विभागाअंतर्गत अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगत आमदार मुंदडा यांनी केज शहराचे नगरपालिकेत आणि नेकनूरचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची विनंती केली. अंबाजोगाई शहराची हद्दवाढ करण्याच्या प्रस्तावालाही तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, सेवानिवृत्त नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा ‘संचित पोर्टल’वरून मंजूर करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, याकडेही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. सदर योजनेची कामे रखडल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या कामांना गती देऊन मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत आणि नियोजनबद्ध करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेल्या या मागण्यांचा शासन सकारात्मक विचार करेल आणि लवकरच याबाबत जनहिताचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केला आहे.