आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले

केज – एका भोळसर व गतिमंद तरुणी ही एकटीच गोठ्यात असल्याची संधी साधून एका नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात बुधवारी घडली आहे. आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
केज तालुक्यातील एका गावातील भोळसर व गतिमंद तरुणी ही रोज आपल्या भावजयीसोबत शेतात जाते. २ जून रोजी भावजयी ही लहान मुलाला डोस देण्यासाठी आरोग्य उपकेंद्रात गेली. ही तरुणी शेतात जाऊन गोठ्यात थांबली होती. ही गतिमंद तरुणी एकटीच असल्याची व जवळ कोणी नसल्याची संधी साधून नानासाहेब भानुदास चौरे या नराधमाने गोठ्यात जाऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करीत होता. याचवेळी तिची भावजयी शेतात गेली असता तिच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर आरोपीने त्यांना धमकी देऊन गावात पळून गेला. भावजयीने तिच्या पतीला हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी गावातील लोकांना माहिती दिली. नागरिकांनी नानासाहेब चौरे यास पकडून ठेवून पोलिसांना माहिती दिली. केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहायक पोलिस निरीक्षक क्षीरसागर, फौजदार सय्यद कराडकर, पोलिस कॉन्स्टेबल शेख शमीम पाशा यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित तरुणीची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. याप्रकरणी भावजयीच्या तक्रारीवरून नानासाहेब चौरे विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

यापूर्वी नानासाहेब चौरे अनेक गुन्हे

नानासाहेब चौरे याच्यावर पूर्वर्वीदेखील लैंगिक अत्याचार, बालकांचे शोषण, अॅट्रॉसिटीसह, अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. एका लैंगिक गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली आहे. तर एक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

वाल्मीक कराडच्या समर्थनासाठी आंदोलन केले होते

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोप असलेले वाल्मीक कराड याच्यावरील सर्व गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे म्हणून नानासाहेब भानुदास चौरे याने राजेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते.