Breaking
Updated: June 10, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज: केज शहर हे खामगाव-पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर या महामार्गाच्या जोडणीवर असलेले शहर आहे. वरील दोन्ही महामार्ग झाल्यानंतर आता केज शहरातील भागात वाहतूक व रहदारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातच वरील दोन्ही महामार्ग केज च्या आंतरिक भागात भवानी चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (चौक) या भागात एकत्र येत असल्याने या भागात एकत्रित वाहतुकीचा भार वाढला आहे.
हा रस्ता बनवताना महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडे केज विकास संघर्ष समितीने धारूर चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत दोन्ही बाजुने किमान दोन मीटर रस्ता वाढवून बनवावा यासाठी आंदोलनाद्वारे मागणी केली होती मात्र लेखी आश्वासन देऊनही त्याची पूर्तता संबंधित यंत्रणेने केलेली नाही.
तसेच बनवलेल्या रस्त्यावर नालीकाम मूळ जुन्या नालीवर न घेतल्याने नवीन नाली रस्त्याकडील बाजूने आल्याने रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहनांना तात्पुरती पार्किंग देखील रस्त्यावर करावी लागत आहे. रस्त्यावर होणारी वाहनांची पार्किंग, धावणारी वाहने यामुळे विद्यार्थी, महिला व वृद्धांना या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत अवघड बनले आहे. या भागात वाहतुकीसाठी फक्त एक ट्रॅक रस्ता उपलब्ध असतो ज्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
सुविधा झाल्याने या दोन्ही महामार्गावर धावणाऱ्या अवजड वाहनांची संख्या व गतीही वाढली आहे. परिणामतः केज शहरातील या अंतर्गत भागातील रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढून केजच्या अनेक युवक-नागरिकांना जीव गमवावा लागलेला आहे.
ही समस्या सोडवण्यासाठी आता केजच्या नागरिकांना विश्वासात घेऊन केज शहराला बाह्य भागातून पर्यायी बायपास/रिंगरोड किंवा उड्डाण पूल यापैकी जे सोयीचे व उपयोगी असेल ते तात्काळ मंजूर करणे खूप आवश्यक आहे. बाह्य रस्ता केल्यास तो रिंगरोड स्वरूपात असणे गरजेचे आहे. दोन महामार्ग जोडणारा बायपास रिंगरोड स्वरूपात असणे आहे. केवळ एका बाजूने बायपास केल्यास ही समस्या पुन्हा कायम राहू शकते.
ही बाब तात्काळ न केल्यास येत्या कांही दिवसात भवानी चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या भागातील रस्त्यावर नागरिकांना प्रवास करणे अत्यंत धोकेदायक व जीवघेणे बनले आहे.
यासाठी केज विकास समिती लवकरच केजच्या आमदार नमिताताई मुंदडा व बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या भेटी घेऊन निवेदनाद्वारे यासाठी लक्ष देण्याची विनंती करणार आहे.
प्रशासकीय स्तरावर या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समिती येत्या शुक्रवार दि 13 जून 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता केज बसस्थानकासमोर महामार्गावर ‘रास्तारोको’ आंदोलन करणार आहे. तरी केज शहर व परिसरातील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन समन्वयक हनुमंत भोसले यांनी केले आहे. निवेदनावर नासेर मुंडे, शेषराव घोरपडे, नारायणराव अंधारे, संपत वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.