Breaking
Updated: डिसेंबर 18, 2025
दिवसभर शोध घेऊनही पथकाच्या हाती निराशा, शुक्रवारी पुन्हा शोध घेणार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelदिवसभर शोध घेऊनही पथकाच्या हाती निराशा, शुक्रवारी पुन्हा शोध घेणार
अंबाजोगाई: शहरालगत असलेल्या काळवीट तलावात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. पंचायत समितीचे सेवानिवृत्त कर्मचारी विश्वनाथ बुरांडे हे नेहमीप्रमाणे तलावात पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बेपत्ता झाले आहेत. दिवसभर अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली, मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नाही. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ बुरांडे (वय ६४, रा. अंबाजोगाई) हे निवृत्त कर्मचारी असून आरोग्याच्या दृष्टीने ते दररोज सकाळी काळवीट तलावावर पोहण्यासाठी जात असत. गुरुवारी सकाळीही ते आपल्या नित्यनियमानुसार तलावावर पोहोचले. त्यांनी काठावर आपले कपडे आणि गळ्यातील माळ काढून ठेवली आणि पोहण्यासाठी तलावाच्या पात्रात उतरले. मात्र, बराच कालावधी उलटूनही ते पाण्याबाहेर न आल्याने त्यांच्यासोबत आलेल्या व परिसरातील इतर नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. उपस्थितांनी तात्काळ आरडाओरडा करत घटनेचे गांभीर्य ओळखून अंबाजोगाई नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला आणि प्रशासनाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तरुणांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावाच्या पाण्यात शोध घेण्याचे काम सुरू केले. पाण्याचा अंदाज येत नसल्याने परळी येथून खासगी रेस्क्यू टीमला देखील पाचारण करण्यात आले. दुपारपासून ते सायंकाळी सूर्य मावळेपर्यंत बचाव पथकांचे शोधकार्य अविरत सुरू होते, परंतु बुरांडे यांचा थांगपत्ता लागू शकला नाही. अखेर सायंकाळी अंधार पडल्यामुळे आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज घेणे कठीण झाल्याने शोधकार्य तात्पुरते थांबविण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी बीड येथून एक विशेष शोध पथक घटनास्थळी दाखल होणार असून त्यांच्याकडे पाण्यातील वस्तू शोधण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे उपलब्ध आहेत. या कॅमेरांच्या मदतीने पुन्हा नव्याने शोधमोहीम राबवली जाणार आहे. या संपूर्ण घटनेवर स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासन लक्ष ठेवून आहेत.
जन्मदिवसाच्या दिवशीच झाले बेपत्ता
विश्वनाथ बुरांडे यांचा १८ डिसेंबर हा जन्मदिवस आहे. नेमके याच दिवशी ते तलावात बेपत्ता झाले आहेत. या दुर्दैवी योगायोगा बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.