Breaking

नंदकिशोर मुंदडा यांच्या उमेदवारीचे नागरीकातून जोरदार स्वागत

Updated: नोव्हेंबर 12, 2025

By Vivek Sindhu

गोरगरीब, गरजवंत रुग्णांना निस्वार्थ मदतीचा हात देणारे आरोग्यसेवक : नंदकिशोर मुंदडा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘काकाजी’ नगराध्यक्ष व्हावेत हीच सर्वसामान्य जनतेची इच्छा

अंबाजोगाई : अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी नंदकिशोर मुंदडा (काकाजी) हे उमेदवार असतील हे आता निश्चित झाले आहे. त्यांची उमेदवारी निश्चित होताच कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

चार दशकांहून अधिक काळ जनसेवेच्या माध्यमातून ओळख निर्माण केलेले काकाजी हे अंबाजोगाईतील प्रत्येक घराघरात परिचित नाव आहे. ४७ वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी कधीही व्यक्तिगत पदाचा मोह धरला नाही. घरात फक्त आमदारकीचे एकच पद, इतर सर्व पदे कार्यकर्त्यांसाठी अशी त्यांची नेहमीची भूमिका राहिली आहे. समाजकारण आणि वैयक्तिक संपर्काच्या बळावर त्यांनी प्रत्येक समाजातील सर्व घटकांना आपलेसे केले आहे. एखाद्याचे काम करताना तो आपला आहे की परका, समर्थक आहे की विरोधक असा विचार त्यांनी कधीच केला नाही.

नंदकिशोर मुंदडा यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. रुग्णालय असो वा वीज वितरण कार्यालय, नागरिकांच्या कोणत्याही समस्येवर त्यांचा त्वरित प्रतिसाद असतो. काकाजींना फोन केला आणि काम झाले नाही असे उदाहरण नाही, असे सर्व नागरिक उत्साहाने सांगतात. सर्वांच्या अडचणींना स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे धावून जाणारे, २४ तास लोकांसाठी उपलब्ध असलेले हे नेतृत्व आज नागरिकांच्या मनावर राज्य करीत आहे.

त्यामुळे अंबाजोगाईचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी यावेळी नंदकिशोर मुंदडा यांनी स्वतः नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी सर्व कार्यकर्त्यांसह शहरातील अनेक नागरिकांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होताच सर्व कार्यकर्त्यात उत्साह आहे. तसेच सामान्य जनतेतून देखील त्यांच्या उमेदवारीचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.

नंदकिशोर मुंदडा यांनी मोठ्या उत्साहात प्रचार सुरु केला असून आजवरच्या हयातीत इतरांसाठी मत मागणारे काकाजी यावेळी प्रथमच स्वतःसाठी मत मागत आहेत. शहरातील विविध भागांत भेटीगाठींमध्ये शेकडो नागरिक स्वतःहून उपस्थित राहून त्यांचे स्वागत करत आहेत. सर्वच ठिकाणी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून नंदकिशोर मुंदडा यांच्या रूपाने अंबाजोगाई शहराला एक अनुभवी, सुसंवादी आणि लोकाभिमुख नेतृत्व मिळणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. ‘काकाजी’ नगराध्यक्ष व्हावेत, अशी जनतेची उघड इच्छा आता व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts