Breaking
Updated: ऑक्टोबर 1, 2025
सामाजिक कार्यकर्ते पियुष शिंदे यांचा कौतुकास्पद पुढाकार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी यावर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगळा संदेश दिला होता. पुष्पगुच्छ, हार, बॅनर किंवा जाहिरातींवर खर्च न करता या भागातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना, पीडितांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबाजोगाई शहरातील सामाजिक कार्यकर्ते पियुष शिंदे यांनी मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल एक लाख रूपयांचा चेक मुख्यमंत्री सहाय्यता निधी नांवाने त्यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी शिंदे यांनी सांगितले की, आज गावोगावी पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा वेळी आपण अनावश्यक खर्च टाळून प्रत्यक्ष मदत केली तरच खरी सेवा होईल. त्यांनी याला सामाजिक जबाबदारी मानून ही मदत केल्याचे स्पष्ट केले. ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी केलेल्या आवाहनामुळे त्यांचा यंदाचा वाढदिवस सामाजिक उपक्रमात रूपांतरित झाला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिंदे यांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्याच्या या उपक्रमांमुळे पीडितांना अल्पसा का होईना दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे.