Breaking
Updated: डिसेंबर 13, 2025
संमतीशिवाय शेतातून नेली पाईपलाईन; जेसीबीमुळे पिकाचे दीड लाखांचे नुकसान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: शेतकऱ्याची कोणतीही परवानगी न घेता शेतात बळजबरीने घुसून जेसीबीच्या साहाय्याने पाईपलाईन केल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील मारफळा येथे उघडकीस आला आहे. या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून, जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यालाच दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध तळवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्जेराव काशीनाथ काबळे (वय ५६, रा. मारफळा, सध्या रा. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांची मारफळा शिवारात गट नं. ५१ मध्ये जमीन आहे. ७ डिसेंबर रोजी आरोपींनी संगनमत करून काबळे यांच्या शेतात अतिक्रमण केले. त्यांनी जेसीबी लावून जमिनीत चर खोदली आणि पाईपलाईन टाकली. यामुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले.
जेव्हा काबळे यांनी याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांना शिवीगाळ करत धमकी देण्यात आली. याप्रकरणी अण्णासाहेब कुटे, संगिता कुटे, गोपाळ कुटे आणि जेसीबी मालक अशोक कुटे (सर्व रा. मारफळा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कोरडे करत आहेत.