अंबाजोगाई : अंबाजोगाई उपविभागाच्या पोलीस अधिकारीपदी नुकतीच आयपीएस अधिकारी ऋषिकेश हनुमंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) त्यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे उपविभागात कायदा आणि सुव्यवस्थेला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिंदे हे २०२३च्या आयपीएस बॅचमधील अधिकारी असून ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरटे गावचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी कोणतीही कोचिंग न घेता केवळ आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळवले आहे.
शिस्तप्रिय, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेल्या शिंदे यांच्या कार्यशैलीतून अंबाजोगाई उपविभागात गुन्हेगारीला आळा बसून लोकांच्या मनात पोलिसांबाबत विश्वास अधिक बळावेल, असा विश्वास स्थानिक प्रशासन आणि नागरिक व्यक्त करत आहेत.