Breaking
Updated: मार्च 9, 2026
आयपीएस राहुल कुमार यांनी स्वीकारला माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रात्याक्षिक प्रशिक्षणाकरिता रुजू झालेले परिविक्षाधीन भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी राहुल कुमार यांनी आज दिनांक ९ मार्च २०२६ रोजी माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार, राहुल कुमार हे आगामी ३० मे २०२६ पर्यंत या पोलीस ठाण्याचे कामकाज पाहणार आहेत.
राहुल कुमार हे २९ डिसेंबर २०२५ रोजी बीड जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी हजर झाले होते. या कालावधीत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखा, कार्यालयीन कामकाज, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे तसेच गेवराई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कामकाजाचा सखोल अभ्यास केला आहे. पोलीस स्टेशनच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने त्यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या नवीन नियुक्तीमुळे माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक बालक कोळी यांना नमूद कालावधीसाठी नियंत्रण कक्ष, बीड येथे संलग्न करण्यात आले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर राहुल कुमार यांनी तातडीने कामाला सुरुवात केली असून प्रशासकीय पारदर्शकता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याला आपले प्राधान्य असल्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांना त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ९५६०७१७१४४ आणि ९२२५०९२८३० हे भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.