Breaking
Updated: जानेवारी 5, 2026
सावित्रीबाईंकडून महिलांना मिळते संघर्षाची प्रेरणा - डॉ.सुनीता तोंडगे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसावित्रीबाईंकडून महिलांना मिळते संघर्षाची प्रेरणा – डॉ.सुनीता तोंडगे
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन शहरातील महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा पाया रचला जात आहे. दैनंदिन जीवनात महिलांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावत असल्याचा आनंद क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.सुनीता मोदी यांनी व्यक्त केला. तर सावित्रीबाईंकडे पाहून महिलांना संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन डॉ.सुनीता तोंडगे यांनी केले. त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होत्या.
शहरातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने जयंतीनिमित्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.सुनीता राजकिशोर मोदी या होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विजयाताई पाटील, मानसी पवार आणि डॉ.सुनिता तोंडगे, पतसंस्थेच्या सचिव शोभा बाबू खडकभावी, संचालक उषा गणेश मसने, अंजली विष्णुपंत मस्के, सविता विजय रापतवार, संगीता विष्णू सरवदे, परवीन नुजहत फारूखी, सुरेखा बाबुराव खंडाळे, जमुना चोकडा, मोदी ज्वेलर्सच्या संचालिका सरोज मोदी यांच्यासह शाखा व्यस्थापक सागर कंगळे, कर्मचारी सचिन काशिद, अनिल काळे हे उपस्थित होते. सुरूवातीला ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर पतसंस्थेचे व्यवस्थापक सागर कंगळे यांनी पतसंस्थेच्या सन्माननीय चेअरमन, उपस्थित मान्यवर आणि संचालक मंडळाचे स्वागत केले. यावेळी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.सुनिता तोंडगे यांना मिस महाराष्ट्र मिसेस रनर अप फर्स्ट हा किताब मिळाल्याबद्दल तसेच मानसी पवार यांनी मिस महाराष्ट्र पुरस्कार पटकावला याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मानसी पवार यांनी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सुनीता मोदी व त्यांच्या सर्व संचालिका यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी महिलांनी कोणत्याही क्षेत्रात काम करतांना आपण आहोत त्या ठिकाणी आपले पूर्ण योगदान देऊन आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा मौलिक सल्ला उपस्थित सर्व युवती व महिलांना दिला. तर डॉ.सुनिता तोंडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्यांच्या आयुष्यात समाजाकडून झालेली अवहेलना, छळ याला न डगमगता त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू करीत शिक्षणाची दारे खुली केल्याचे स्पष्ट केले. त्या काळातील सावित्रीबाई यांच्या जीवनातील संघर्ष आठवून आजच्या महिलांना आपल्या जीवनात देखील संघर्ष करण्यासाठीची प्रेरणा मिळते अशी भावना या कार्यक्रमात बोलून दाखवली. सावित्रीबाईंनी जर त्याकाळी संघर्ष केला नसता तर आजही महिलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले असते. सावित्रीबाई यांनी महिलांसाठी सोसलेला त्रास व छळ, तथा तत्कालीन समाज व्यवस्थेशी त्यांनी केलेला संघर्ष पाहूनच आजच्या महिलांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते अशी भावना सुप्रसिद्ध स्त्रीरोग तथा भूल तज्ज्ञ डॉ.सुनीता तोंडगे यांनी व्यक्त केली. यावेळी सौ.विजया दत्तात्रय पाटील यांनी ही सत्कारमूर्तींचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देवून महिला पतसंस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोप करताना पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.सुनीता राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, सावित्रीमाई फुले महिला पतसंस्था ही एक महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्थापन झालेली संस्था आहे, जी महिलांना आर्थिक मदत पुरवते आणि त्यांच्यात बचत व उद्योजकतेला प्रोत्साहन देते. आपली संस्था ही महिलांच्या आर्थिक विकासात योगदान देत आहे, संस्थेच्या कार्यातून सावित्रीमाई यांच्या विचारांचे आणि समाजसुधारणेचे कार्य पुढे नेले जात आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी कर्जपुरवठा करणे, बचत योजना देणे आणि व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हे आपले उद्दिष्ट आहे. महिलांना बचतीची सवय लावण्यासाठी बचत योजना राबविण्यात येते. सावित्रीमाई यांच्या जयंतीनिमित्त आगामी काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याचा प्रचार करणे, जसे की, शिक्षण आणि महिला हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे यासाठी आपण कटिबद्ध आहोत. ही संस्था महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे, जी सावित्रीमाई यांच्या विचारांनी प्रेरित आहे. आपल्या देशाची संस्कृती ही पुरूषप्रधान संस्कृती आहे. यामुळे समाजात बहुतांश वेळी महिलांना दुय्यम स्थान देताना दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून बहुतांश महिला भगिनी या आपले घर, चूल आणि मूल यामध्येच गुरफटलेल्या आढळून येतात. कुटुंबात तसेच दैनंदिन व्यवहारात महिलांना आर्थिक स्वायत्तता नसते. हीच बाब लक्षात घेऊन साधारणपणे १० वर्षांपूर्वी पतसंस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांनी केवळ महिलांनी महिलांसाठीच चालवावी अशा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या पतसंस्थेमुळे महिलांना काही प्रमाणात का होईना आर्थिक स्वायत्तता मिळून त्यांचा व कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरातील आर्थिक सशक्तीकरणाचा पाया मजबूत केला जात आहे अशी माहिती चेअरमन सौ.सुनीता मोदी यांनी दिली. पतसंस्था करीत असलेल्या आर्थिक उन्नतीचे सर्वस्वी श्रेय हे पतसंस्थेचे संस्थापक तथा मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांच्यासह पतसंस्थेच्या सर्व संचालिका, ग्राहक, ठेवीदार, सभासद, कर्मचारी, हितचिंतक आणि महिलांनी घेतलेल्या कर्जाचा वेळेवर परतावा यालाच द्यावे लागेल असेही चेअरमन सौ.मोदी म्हणाल्या. तर सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक करून या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित सर्व संचालिका, सभासद,व खातेदारांचे आभार सुरेखाताई खंडाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष ढगे, महिला पतसंस्थेचे व्यवस्थापक सागर कंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात अंबाजोगाई शहर व परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.