Breaking
Updated: मार्च 18, 2026
५ लाखांच्या मागणीसाठी सासरच्यांकडून अमानुष छळ
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: सासरच्या मंडळींनी ५ लाख रुपयांच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला ‘तिहेरी तलाक’ दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित २६ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तय्यब नगर, गेवराई येथील रहिवासी तब्बोसुम गुलामरसुल शेख यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी गुलामरसुल इब्राहीम शेख याच्याशी झाला होता. सुरुवातीचे सहा महिने चांगले वागवल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला पैशांसाठी त्रास देण्यास सुरुवात केली. पती गुलामरसुल इब्राहीम शेख, सासू अहेमदबी इब्राहीम शेख, सासरे इब्राहीम मोहम्मद शेख, ननंद आशिया मौजम सय्यद आणि नंदावा मौजम सय्यद हे सर्वजण तिला मूल होत नसल्याच्या कारणावरून टोचून बोलत असत आणि उपाशीपोटी ठेवून अतोनात कामे करून घेत असत. गाडी घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिने यापूर्वी गर्भधारणा झाली असताना पतीने तिला जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडले होते. सध्या ती दीड महिन्याची गरोदर असताना पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. १५ मार्च २०२६ रोजी पीडितेच्या आईसमोरच सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केली आणि पतीने “तलाक, तलाक, तलाक” असे तीन वेळा म्हणून बेकायदेशीररीत्या घटस्फोट दिला. यानंतर तिला अंगावरील दागिन्यांसह घराबाहेर हाकलून देण्यात आले.
या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नंदकिशोर सवासे करत आहेत.