Breaking

भारताचं ‘HOPE स्टेशन’ लडाखमधून अवकाशात एक पाऊल पुढे : ISRO चं पहिलं अॅनालॉग मिशन सुरू

Updated: August 5, 2025

By Vivek Sindhu

1200 675 24738285 thumbnail 16x9 isro

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) लडाखच्या त्सो कार परिसरात देशाच्या पहिल्या अॅनालॉग अंतराळ मोहिमेला सुरुवात करत ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. ‘ह्युमन आउटर प्लॅनेट एक्सप्लोरेशन’ म्हणजेच HOPE स्टेशनचं उद्घाटन ISRO चे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या हस्ते करण्यात आलं.

ही मोहीम भारताने 2027 मध्ये अंतराळवीर अवकाशात पाठवण्याच्या आणि 2040 पर्यंत चंद्रावर मानवी मोहीम राबवण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल मानली जात आहे. 1 ते 10 ऑगस्ट 2025 या दहा दिवसांच्या कालावधीत ही मोहीम त्सो कारच्या कठीण हवामानात राबवली जात असून, यामध्ये दोन संशोधक — एरोस्पेस अभियंता राहुल मोगलापल्ली आणि अॅस्ट्रोबायोलॉजिस्ट यमन अकोट — HOPE स्टेशनवर वास्तव्यास असणार आहेत.

हे स्टेशन ISRO आणि बेंगळुरूस्थित प्रोटोप्लॅनेट या खासगी अंतराळ कंपनीच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलं असून त्यात 8 मीटर व्यासाचं निवासी मॉड्यूल आणि 5 मीटर व्यासाचं उपयुक्तता मॉड्यूल एकत्रित जोडण्यात आलं आहे.

त्सो कार परिसरातील नैसर्गिक हवामान, कमी दाब, तीव्र अतिनील किरणं, थंडी आणि खारट परिमाफ्रॉस्ट यामुळे हे क्षेत्र मंगळ ग्रहाच्या पर्यावरणाची जवळची प्रतिकृती मानलं जातं. याच कारणामुळे ते अॅनालॉग मिशनसाठी सर्वोत्तम ठिकाण ठरतं.

या प्रयोगात भारतीय अंतराळ विज्ञान संस्था (IIST), राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (RGCB), IIT हैदराबाद, IIT मुंबई आणि बेंगळुरूचं एरोस्पेस मेडिसिन इन्स्टिट्यूट यांचा सहभाग आहे. यामध्ये मानवी जैविक आणि मानसिक प्रतिक्रिया, डीएनए स्तरावरील बदल, आरोग्य निगराणी प्रणाली, ग्रहांवरील कृती प्रक्रिया, सूक्ष्मजीवांचे विश्लेषण यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची चाचणी घेतली जाणार आहे.

ISRO ने आपल्या अधिकृत X (पूर्वीचं ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “HOPE स्टेशन हे केवळ अनुकरण नाही, तर भविष्यासाठी सराव आहे.” या मिशनमधून मिळणाऱ्या डेटावरून भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांसाठी पायाभूत संरचना, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण पद्धती अधिक परिपक्व होतील.

त्सो कार येथील 4,530 मीटर उंचीवर साजरं होणारं हे मिशन म्हणजे भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातली एक महत्त्वाची वाटचाल आहे. या उपक्रमामुळे भारत केवळ अवकाशात नव्हे तर संशोधनाच्या जागतिक पातळीवरही स्वतःचं स्थान अधिक बळकट करत आहे.

Recent Posts

ई-20 पेट्रोलने इंजिन खराब होते का? केंद्र सरकारने केला खुलासा!

ई-20 पेट्रोलने इंजिन खराब होते का? केंद्र सरकारने केला खुलासा!