Breaking

खा.सोनवणे पोहचले ब्राझील मध्ये; ऊस उत्पादकांसाठी नवीन तंत्रज्ञानाची पाहणी इंडिया-ब्राझील शुगर अँड बायो एनर्जी मिशन अभ्यास दौरा

Updated: June 19, 2025

By Vivek Sindhu

इंडिया-ब्राझील शुगर अँड बायो एनर्जी मिशन अभ्यास दौरा

WhatsApp Group

Join Now

बीड: जगातील सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझीलमध्ये आयोजित ‘इंडिया-ब्राझील शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन’ या अभ्यास दौऱ्यात बीडचे खा.बजरंग सोवणे यांनी सहभाग नोंदविला आहे. दि.१५ जून पासून एक आठवड्याचा हा अभ्यास दौरा आहे. ब्राझिलमध्ये ते ऊस उत्पादकांच्या फायद्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची पाहणी करत आहेत.भारताच्या नॅशनल शुगर फेडरेशनच्या पुढाकाराने आयोजित या दौऱ्याचा उद्देश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून साखर व सहउत्पादनांच्या माध्यमातून उद्योगास उभारी देणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादकांना अधिक समृद्ध बनविणे हा आहे. या अभ्यास दौऱ्यात राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजलगाव छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन मोहन जगताप तसेच नॅशनल शुगर फेडरेशनचे विविध तज्ञ सहभागी झाले आहेत. साखर उद्योगासाठी लागणारे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, जैवऊर्जा निर्मितीची प्रगत साधने आणि सहउत्पादनांच्या नव्या शक्यता यांचा सखोल अभ्यास या मिशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ब्राझीलच्या अनुभवातून आपण भारतीय साखर उद्योगाला अधिक सक्षम बनवू शकतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हे तंत्रज्ञान आणि योजना भारतात लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे खा.बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक असून नवनवीन तंत्रज्ञानातून ऊस उत्पादकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडू शकतो, यासाठीच आपण अभ्यास दौऱ्यावर आलो असल्याचा उल्लेखही खा.बजरंग सोनवणे यांनी आवर्जून केला आहे.